Chiplun Illegal Cattle Transport Case: पोफळी पवारवाडी-फाटा परिसरात १३ गुरांसह टेम्पो जप्त; अलोरे-शिरगाव पोलिसांची कारवाई

Chiplun Illegal Cattle Transport Case: पोफळी पवारवाडी-फाटा परिसरात १३ गुरांसह टेम्पो जप्त; अलोरे-शिरगाव पोलिसांची कारवाई

कत्तलीच्या उद्देशाने वाहून नेण्यात येणारी गुरे पोलिसांकडून मुक्त; सोलापूरच्या दोघा तरुणांवर गुन्हा दाखल

चिपळूण (रत्नागिरी):
चिपळूण तालुक्यातील पोफळी पवारवाडी-फाटा परिसरात अलोरे-शिरगाव पोलिसांनी सोमवारी रात्री धडक कारवाई करत बेकायदेशीरपणे गुरे वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला. अत्यंत निर्दयीपणे तब्बल १३ गुरे कोंबून कत्तलीच्या उद्देशाने वाहून नेली जात असताना पोलिसांनी ही तत्पर कारवाई केली. या प्रकरणी दोन तरुणांवर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुक्त करण्यात आलेल्या सर्व १३ गुरांना लोटे येथील गोशाळेत सुरक्षित पाठवण्यात आले आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी गुरांसह टेम्पो असा एकूण ९ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

उस्मानाबाद आणि सोलापूरच्या चालकांवर गुन्हा
या बेकायदेशीर गुरे वाहतूक प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

Kohinoor furni.1

किरण अनिल धनवडे (वय २८, रा. उस्मानाबाद)

अण्णा शिवाजी बंडगर (वय २३, रा. सोलापूर)

याबाबतची अधिकृत फिर्याद अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रमोद रघुनाथ कदम यांनी दिली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
सोमवारी रात्री किरण धनवडे व अण्णा बंडगर यांनी संगनमत करून टेम्पोच्या मागील हौद्यात १३ गुरांना वेदना व यातना होतील अशा अत्यंत दाटीवाटीने आणि आखूड दोरीने बांधले होते. या गुरांची कत्तलीसाठी किंवा विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात होती. याबाबतची गोपनीय माहिती मिळताच अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने पोफळी-पवारवाडी फाटा परिसरात तातडीने नाकाबंदी करून सापळा रचला.

हा टेम्पो चिपळूण-कराड मार्गावरून पोफळी पवारवाडी फाटा परिसरात येताच पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली. त्यावेळी टेम्पोमध्ये अत्यंत वाईट स्थितीत गुरांना कोंबल्याचे निदर्शनास आले. ही गुरे सोलापूरच्या दिशेने नेण्यात येत होती.

९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त; बीएनएसएस अंतर्गत नोटीस
पोलिसांनी टेम्पोसह १३ गुरांचा असा एकूण ९ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दोन्ही संशयितांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) नियमांनुसार नोटीस बजावली आहे. लोटे येथील गोशाळेत सर्व गुरांची व्यवस्था करण्यात आली असून, अलोरे-शिरगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.