‘सरकारने गायब करायच्या आधी बघून घ्या!’ राज ठाकरेंचे सोशल मीडियाद्वारे आव्हान
मुंबई:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काल पत्रकार परिषदेत भाकित केल्यानंतर, आज सकाळी राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदाणी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी एक वादग्रस्त डॉक्युमेंट्री फिल्म पोस्ट केली आहे.
"सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी सर्वांनी बघून घ्या!" असे थेट आणि आव्हान देणारे आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केले आहे.
मुंबई पोलिसांची नोटीस आणि डॉक्युमेंट्रीचा वाद
याआधी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक खातेदारांना मुंबई पोलिसांकडून ही डॉक्युमेंट्री हटवण्याच्या संदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या डॉक्युमेंट्रीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी उद्योजक गौतम अदाणी यांना कशा प्रकारे पाठिंबा व मदत देऊन उद्योग क्षेत्रात मोठे केले आणि त्याचा उपयोग आपल्या राजकारणासाठी कसा करून घेतला, याचे सविस्तर वर्णन करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर लगेचच राज ठाकरे यांनी ही डॉक्युमेंट्री स्वतःच्या सोशल मीडियावरून पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

‘पुढच्या ४-५ महिन्यांत देशात मोठी गडबड होणार’
काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर गंभीर वक्तव्य केले होते. "येत्या ४ ते ५ महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होणार आहे. देशातील जनता रस्त्यावर आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही," असा दावा त्यांनी केला होता. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर राज ठाकरे यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, विशेषत: ‘जेन झी’ (Gen Z) युवा मतदारांना आकर्षित करून सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे. याआधी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चाही काढला होता.
EVM ला विरोध आणि बॅलेट पेपरची मागणी
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर (EVM) तीव्र संशय व्यक्त करत पुन्हा एकदा बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची आग्रही मागणी केली.
"देशातील निवडणुका अत्यंत पारदर्शकपणे पार पडल्या पाहिजेत. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ यांसारख्या देशांमध्येही बॅलेट पेपरवरच निवडणुका होतात. संपूर्ण जगभराने EVM नाकारले असताना भारतामध्येच EVM चा अट्टाहास का? फ्रान्समध्ये एका व्यक्तीच्या मागणीवरून आणि सांगण्यावरून जर बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली जाऊ शकते, तर भारतात का नाही?"
— राज ठाकरे (अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)













