Manoj Jarange Audio Clip Eknath Shinde: मनोज जरांगे पाटलांनी ऐकवली ५०० कोटींच्या आरोपांची ऑडिओ क्लिप..पत्रकार परिषदेत क्लिप ऐकवून विचारले प्रश्न

Manoj Jarange Audio Clip Eknath Shinde: मनोज जरांगे पाटलांनी ऐकवली ५०० कोटींच्या आरोपांची ऑडिओ क्लिप..पत्रकार परिषदेत क्लिप ऐकवून विचारले प्रश्न

संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या नावाचाही उल्लेख

मुंबई/जालना:
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ५०० कोटी रुपयांच्या व्यवहारावरून सुरू झालेला वाद आता आणखी पेटला आहे. नारायण गडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप भाजपचा हवाला देत केला होता. या आरोपांनंतर शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले असतानाच, आज मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेत थेट एक ऑडिओ क्लिप ऐकवून राज्याच्या राजकारणात नवा बॉम्ब फोडला आहे.

५०० कोटींचे आरोप आणि शिंदे गटाचे प्रत्युत्तर
दसरा मेळाव्यात जरांगे पाटलांनी केलेल्या ५०० कोटींच्या दाव्यानंतर शिंदे गटाने जरांगे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर जरांगेंचा ‘बोलवता धनी’ कोण आहे, याचे सर्व पुरावे मुख्यमंत्री शिंदेंकडे देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः "ना ५०० कोटी घेतले, ना ५०० कोटी दिले" असे स्पष्ट करत हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, या टीकेला उत्तर देताना जरांगे यांनी थेट ऑडिओ क्लिप जाहीर करून नवा राजकीय वाद निर्माण केला आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंचा उल्लेख
मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेली ऑडिओ क्लिप अत्यंत मोठी असून, त्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये सुरू असलेला संवादाचा आवाज ऐकायला मिळत आहे. या संभाषणादरम्यान शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

Tata motars tiago

ऑडिओ क्लिपमध्ये सुषमा अंधारे यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. संभाषण करणाऱ्या व्यक्तींमध्ये, "अंधारे खूपच खालच्या लेव्हलला आहे, तिच्या नादाला लागायचे नाही…" असे विधान केले जात असून, दुसरी व्यक्ती त्यावर सहमती दर्शवत हसताना ऐकू येत आहे.

५०० कोटी कोणी घेतले? विचार करा: जरांगे पाटील
ही ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर मांडताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी ५०० कोटी रुपये नक्की कोणी घेतले आणि कोणाकडे गेले, याचा विचार करावा."

या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले असून, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.