Chiplun Kalwande Dam Water Crisis: कळवंडे धरणात अवघा ८ टक्के पाणीसाठा

Chiplun Kalwande Dam Water Crisis: कळवंडे धरणात अवघा ८ टक्के पाणीसाठा

२२ ऑक्टोबरला महत्त्वाची बैठक

चिपळूण (रत्नागिरी):
चिपळूण तालुक्यातील कळवंडे गावात स्वतःचे धरण असतानाही सध्या तेथील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. लघु पाटबंधारे विभागाच्या घोर दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, दुरुस्तीच्या नावाखाली धरणाची पूर्ण वाट लावल्याचा तीव्र आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. सध्या धरणात गाळ वगळता केवळ ८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गावात अधिकारी आणि ग्रामस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भाजीपाल कोठार मानल्या जाणाऱ्या गावाची दैना
कळवंडे गावातील शेतकरी गेली अनेक वर्षे या धरणाच्या पाण्यावर उत्तम भातशेती आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेत होते. चिपळूण शहराच्या गरजेपैकी जवळपास अर्ध्या शहराला पुरेल इतका ताजा भाजीपाला एकट्या कळवंडे गावातून पुरवला जात होता. असे समृद्ध वातावरण असताना, तीन वर्षांपूर्वी लघु पाटबंधारे विभागाने ग्रामस्थांना कोणत्याही विश्वासात न घेता, केवळ निधी खर्च करण्यासाठी या धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.

मात्र, हे दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने पहिल्याच पावसात धरणाला मोठी गळती लागली. गळतीमुळे धरण फुटण्याचा धोका निर्माण झाल्याने लघु पाटबंधारे विभागावर धरण पूर्णपणे रिकामे ठेवण्याची वेळ आली, ज्यावरून ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला.

Shoping fest Khabardar

तीन वर्षांपासून आश्वासनांची खैरात; अधिकारी व लोकप्रतिनिधींवर ताशेरे
या प्रकरणी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये अनेक बैठका पार पडल्या. अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठीच गरज नसताना धरणाची दुरुस्ती काढल्याचा आरोप सातत्याने झाला. त्यावेळी प्रशासनाकडून धरणाची तातडीने दुरुस्ती करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या घटनेला तीन वर्षे उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता थेट लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देण्याचा इशारा दिला आहे.

ऑक्टोबर महिन्यातच जॅकवेल आटल्या
लघु पाटबंधारे विभागाकडून धरणात १६ टक्के पाणीसाठा असल्याचे दावे केले जात असले, तरी धरणातील साचलेला प्रचंड गाळ लक्षात घेता प्रत्यक्ष उपयुक्त पाणीसाठा अवघा ८ टक्केच उरला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. धरणाच्या खालील बाजूस गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जॅकवेल (Jackwell) आहेत. मात्र, धरणातच पाणी नसल्याने या विहिरी आटत चालल्या आहेत.

नुकताच मान्सून संपलेला असताना ऑक्टोबर महिन्यातच गावाला भीषण पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. शिवाय गेल्या तीन वर्षांपासून शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याने ग्रामस्थ आता आरपारच्या लढ्याच्या भूमिकेत आहेत.