Dawood Ibrahim in Pakistan UN India: ‘दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच’ संयुक्त राष्ट्रात भारताकडून पुराव्यांसह पोलखोल

Dawood Ibrahim in Pakistan UN India: 'दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच' संयुक्त राष्ट्रात भारताकडून पुराव्यांसह पोलखोल

डी कंपनीला भारताचा गुन्हेगारी समूह म्हणणाऱ्या विशेष प्रतिनिधीच्या अहवालावर भारताचा तीव्र आक्षेप; अहवाल सुधारण्याची मागणी

नवी दिल्ली:
संयुक्त राष्ट्राच्या एका विशेष प्रतिनिधीने गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या ‘डी कंपनी’ला भारताचा गुन्हेगारी समूह असे संबोधल्यामुळे भारताने तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही पाकिस्तानची आगळीक असल्याचे सांगत भारताने संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तान आणि संबंधित प्रतिनिधीला खडे बोल सुनावले आहेत. ओसामा बिन लादेन ज्या देशात लपला होता आणि मारला गेला होता, त्याच पाकिस्तानात दाऊद इब्राहिम देखील लपून बसला आहे, असा सणसणीत टोला भारतीय प्रतिनिधीने लगावला असून याविषयीचे अनेक ठोस पुरावे उपलब्ध असल्याचेही स्पष्ट केले आहे.

भारताची विशेष प्रतिनिधीला जोरदार चपराक
भारताने दहशतवादविरोधी अहवालातील पक्षपातावरून संयुक्त राष्ट्र संघाच्या विशेष प्रतिनिधीला चांगलेच धारेवर धरले. दाऊद इब्राहिम हा गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानच्या मोठ्या शहरात आश्रयाला आहे, ही बाब संपूर्ण जगाला माहीत आहे. असे असताना तो भारताचा अपराधीक समूह असल्याचा खोडसाळपणा केल्याबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. दाऊदशी भारताचा काहीही संबंध नसून तो पाकिस्तानात लपलेला एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे, असे भारताने ठणकावून सांगितले.

अहवाल तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी
भारतीय प्रतिनिधी रघु पुरी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताची अत्यंत आक्रमक आणि कडक भूमिका मांडली. विशेष प्रतिनिधींनी दाऊद इब्राहिम हा भारतीय दहशतवादी असल्याचे जे म्हटले आहे, त्यावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. तसेच ही घोडचूक तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली. संयुक्त राष्ट्र संघाच्या कारभारावर आणि कार्यशैलीवर अगोदरच नाराजी सुरू असताना अशा प्रकारच्या चुका करणे अजिबात सहन केले जाणार नाही, असे भारतीय प्रतिनिधींनी स्पष्ट शब्दांत फटकारले.

Tata sierra

दाऊद पाकिस्तानातच लपल्याचे पुरावे जगजाहीर
रघु पुरी यांनी पुढे बोलताना सांगितले की, दाऊद इब्राहिम हा भारताचा ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगार असून तो पाकिस्तानमध्येच आश्रयाला आहे. सन २००३ मध्येच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने ‘डी-कंपनी’ आणि तिचा प्रमुख अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांसोबत जोडला गेल्याचे स्पष्ट केले होते. दाऊद इब्राहिम हा १९९३ मधील भीषण मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो पाकिस्तानात लपलेला आहे ही गोष्ट जगजाहीर असून, त्यासंबंधित अनेक पुरावे भारताने यापूर्वीही दिले आहेत. असे असतानाही त्याचा भारताशी संबंध जोडणे आणि भारताला बदनाम करण्याचा हा प्रयत्न पूर्णपणे चुकीचा असल्याचे भारताने सुनावले.