चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी:
पावस ते रत्नागिरी मार्गावर एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या पाईपला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एसटीतील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास पावस ते रत्नागिरी येणाऱ्या रस्त्यावरील विश्वेश्वर घाटीच्या पुढील चढावात घडली. याप्रकरणी बेदरकारपणे एसटी चालवणाऱ्या चालकाविरोधात मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वेश्वर घाटीतील चढावात चालकाचा ताबा सुटला
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश भगवानराव सोनकांबळे (वय ४५, मूळ रा. नांदेड, सध्या रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी चालकाचे नाव आहे.
सोमवारी सकाळी चालक राजेश सोनकांबळे हा आपल्या ताब्यातील एसटी बस (क्रमांक MH-14-BT-4465) घेऊन पावस येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. बस विश्वेश्वर घाटीच्या चढावात येत असताना अचानक त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव एसटीची धडक रस्त्याच्या डाव्या बाजूला मोरीसाठी ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या मोठ्या पाईपला जाऊन बसली.

अपघातात तीन प्रवासी जखमी; पोलिसांत तक्रार दाखल
या जोरदार धडकेत एसटीतील पुढील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत:
सीमा विश्वनाथ उबारे (वय ५७)
गायत्री शैलेश शिंदे (वय ३०)
रामदास दत्ताराम शेलार (वय ६५, सर्व रा. वायंगणी उबारेवाडी, रत्नागिरी)
या अपघात प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र पारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात चालक राजेश सोनकांबळे याच्यावर निष्काळजीपणाने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.













