Ratnagiri MENU 27 NCC Sailing Expedition: रत्नागिरीत ‘मेन्यू २७’ खुल्या समुद्रातील नौकानयन मोहिमेचा दिमाखात शुभारंभ

Ratnagiri MENU 27 NCC Sailing Expedition: रत्नागिरीत ‘मेन्यू २७’ खुल्या समुद्रातील नौकानयन मोहिमेचा दिमाखात शुभारंभ

६० एनसीसी कॅडेट्सचा रत्नागिरी ते पलशेत २५० किमीचा सागरी प्रवास; छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या परंपरेला उजाळा

रत्नागिरी:
युवाशक्ती, सागरी वारसा आणि लष्करी शिस्तीचे विलोभनीय दर्शन घडवत, २ महाराष्ट्र नवल युनिट एनसीसी, रत्नागिरीतर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘मेन्यू २७’ (MENU 27) खुल्या समुद्रातील नौकानयन मोहिमेचा अल्ट्राटेक जेटी येथून उत्साहात शुभारंभ करण्यात आला आहे. कोल्हापूर एनसीसी ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांच्या हस्ते आणि २ महाराष्ट्र नवल युनिटचे कमांडिंग ऑफिसर कमांडर रामंजुल दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. याप्रसंगी भारतीय नौदल, कोस्ट गार्ड, जिल्हा प्रशासन, पोर्ट ऑफिस आणि कस्टम्स विभागाचे वरिष्ठ अधिकारी विशेष उपस्थित होते.

६० एनसीसी कॅडेट्सचा सहभाग आणि कठोर प्रशिक्षण
या मोहिमेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेल्या ६० उत्कृष्ट एनसीसी नौदल कॅडेट्सचा (३५ मुली आणि २५ मुले) समावेश आहे. या कॅडेट्सना ६ ते १५ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या १० दिवसांच्या पूर्व-तयारी शिबिरात (CATC-327) सागरी नेव्हिगेशन, बोट पुलिंग, रिगिंग आणि आपत्कालीन बचावाचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

२७ फूट लांबीच्या ३ डीके व्हेलर (DK Whaler) नौकांचा वापर करून हे कॅडेट्स रत्नागिरी ते पलशेत आणि परतीचा असा एकूण २५० किलोमीटरचा आव्हानात्मक प्रवास खुल्या समुद्रात पूर्ण करणार आहेत. या प्रवासादरम्यान तिवरी, जयगड, बोरिया आणि पलशेत या ठिकाणी त्यांचे मुक्काम असणार आहेत.

Swami swaru. Pat.

“कोकण ज्ञान तरंग” संकल्पना आणि सामाजिक उपक्रम
“कोकण ज्ञान तरंग” ही संकल्पना आणि “ज्ञानाच्या लाटा, प्रगतीच्या वाटा” या ध्येयवाक्यासह राबवली जाणारी ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा आरमाराच्या ऐतिहासिक सागरी परंपरेला उजाळा देत आहे. तसेच, “ज्ञान आणि प्रगतीची वाट: आदर्श कोकणाच्या दिशेने नौकानयन” या सामाजिक उपक्रमांतर्गत कॅडेट्स थांब्यांच्या ठिकाणी तटीय सुरक्षा, सागरी प्रदूषण आणि समुद्र स्वच्छतेविषयी रॅली, पथनाट्य व प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित करणार आहेत. ही मोहीम एनसीसीच्या ‘मोस्ट एंटरप्रायझिंग नेवल युनिट’ (MENU 27) या पंतप्रधान रोलिंग ट्रॉफीच्या राष्ट्रीय स्पर्धेचा मुख्य भाग असून याद्वारे महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टरेटला महत्त्वपूर्ण गुण मिळणार आहेत.

सुरक्षेसाठी विशेष एस्कॉर्ट व बचाव नौका तैनात
कॅडेट्सच्या सुरक्षेसाठी वेस्टर्न नवल कमांड, कोस्ट गार्ड स्टेशन रत्नागिरी, एमआरसीसी मुंबई, प्रादेशिक बंदर कार्यालय, कस्टम्स विभाग आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने ३ विशेष एस्कॉर्ट व बचाव नौका ताफ्यासोबत तैनात करण्यात आल्या आहेत.

मोहिमेच्या प्रारंभी बोलताना कोल्हापूर एनसीसी ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांनी, “ही मोहीम केवळ स्पर्धेपुरती मर्यादित नसून तरुणांमधील नेतृत्वगुण, साहस आणि शिस्त घडवणारी आहे,” असे सांगितले. तर, कमांडिंग ऑफिसर कमांडर रामंजुल दीक्षित यांनी, “आमचे कॅडेट्स समुद्राच्या लाटाेशी दोन हात करण्यासोबतच किनारपट्टीवरील गावांमध्ये जाऊन सागरी स्वच्छता आणि तटीय सुरक्षेचा महत्त्वाचा संदेशही देतील,” असा विश्वास व्यक्त केला.