सुमारे २ कोटी २५ लाखांचे बजेट मांडले जाणार असून ३ नोव्हेंबरला स्थायी समिती तर २ नोव्हेंबरला जलव्यवस्थापन व शिक्षण समितीची बैठक होणार
ZP Budget Meeting म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये विविध महत्त्वपूर्ण बैठकांचा धडाका पाहायला मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सण असल्याने, दिवाळीपूर्वीच सर्व प्रशासकीय नियोजन पूर्ण करण्याच्या हेतूने या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली या बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.
या नियोजनात सर्वात महत्त्वाची असलेली सुधारित विशेष बजेटची सभा ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभाग आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून खर्चाचे २०२६-२७ चे सुधारित अंदाजपत्रक या विशेष सभेत मांडले जाणार आहे. यामध्ये २०२५-२६ मधील प्रत्यक्ष खर्च आणि २०२६-२०२७ ची मूळ अंदाजपत्रकीय तरतूद व एकूण आवश्यक तरतूद यावर सविस्तर चर्चा घडवून आणली जाईल.
मागील वर्षाचा प्रत्यक्ष खर्च आणि यावर्षीची तरतूद मिळून सुमारे २ कोटी २५ लाख रुपयांचे बजेट या सभेत मांडण्यात येणार असून त्याला मंजुरी दिली जाणार आहे. या बजेटमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार, मेळावे, शाळा दुरुस्ती, क्रीडा विजेत्यांना पुरस्कार देणे, शैक्षणिक सहल यासह तब्बल २७ प्रकारच्या योजना आणि खर्चावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर कृषी, ग्रामीण पाणीपुरवठा, रोजगार हमी, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालकल्याण विभागाचा अर्थसंकल्प देखील सादर केला जाईल.

विशेष अर्थसंकल्पीय सभेपूर्वी ३ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये कृषी, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, जलजीवन मिशन यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर आढावा घेतला जाणार आहे.
या बैठकांच्या मालिकेची सुरुवात २ नोव्हेंबरपासून होणार असून, २ नोव्हेंबर रोजी जलव्यवस्थापन समिती आणि शिक्षण समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दिवाळीपूर्वीच सर्व विषयांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.













