रत्नागिरी एसटी विभागातील अनियमिततेमुळे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला मनस्ताप; अतिरिक्त बसेस सोडण्याची प्रवाशांची मागणी
रत्नागिरी : Rajapur Lanja ST Bus Schedule म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, पाली आणि हातखंबा परिसरातील एसटी बससेवेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. विशेषतः सायंकाळी ५ नंतर बसेसची संख्या अत्यंत कमी होत असल्याने प्रवाशांना तासनतास बसस्थानकावर ताटकळत राहावे लागत आहे. काही मार्गांवर सायंकाळी ५:१५ नंतर थेट ७ वाजता बस उपलब्ध होत असल्याने नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
Rajapur Lanja ST Bus Schedule मुळे १२० हून अधिक प्रवाशांना कोंबून करावा लागतोय प्रवास
दिवाळी आणि नवरात्रोत्सवाच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढलेली असतानाही पुरेशा बसेस उपलब्ध होत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. परिणामी, प्रवाशांना अत्यंत गर्दीच्या बसमधून उभे राहून आणि एकाच बसमध्ये तब्बल १२० हून अधिक प्रवाशांना कोंबून प्रवास करावा लागत आहे. क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होत असल्याने हा प्रवास अत्यंत गैरसोयीचा आणि धोकादायक ठरत आहे. वेळेत एसटी बस मिळत नसल्याने अनेक प्रवाशांना नाइलाजाने जास्त पैसे देऊन खासगी बस आणि वडापचा आधार घ्यावा लागत आहे.

हुबळी बस दीड महिन्यांपासून बंद; प्रवाशांची गैरसोय
हुबळीवरून रत्नागिरीत आलेली एसटी बस पुढे रत्नागिरी-लांजा मार्गावर जात असे. मात्र, मागील दीड महिन्यांपासून ही बस पूर्णपणे बंद असल्याने या मार्गावरील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. याशिवाय सायंकाळी ६:१५ ची राजापूर बस कधी सुरू तर कधी बंद राहत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. एसटीच्या या अनियमिततेमुळे प्रवाशांना आपल्या रोजच्या प्रवासाचे नियोजन करताना अडचणी येत असून सायंकाळी ६:३० ची बस नियमित सोडावी, अशी मागणी जोर धरत आहे.
*नवीन बसेस दाखल, तरीही समस्या कायम
*
एसटी प्रशासनाकडून रत्नागिरी विभागात नवीन बसेस दाखल करण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र प्रवाशांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी बस फेऱ्यांची संख्या वाढवणे, बंद असलेल्या फेऱ्या पूर्ववत सुरू करणे आणि वेळापत्रक नियमित ठेवणे आवश्यक आहे. दोन बस फेऱ्यांमधील मोठा कालावधी कमी करून वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे.
अधिकारी व प्रवाशांच्या प्रतिक्रिया:
आश्वजित जानराव (विभाग नियंत्रक, रत्नागिरी): "लांजा, राजापूर भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ देणार नाही. याबाबत योग्य माहिती घेऊन संध्याकाळची लांजा आणि राजापूरची बस वेळेत सोडण्यात येईल."
अक्षय पाटील (प्रवासी): "दररोज लांजा-रत्नगिरी प्रवास करतो. दोन तासांच्या अंतराने बस येत असल्याने घरी जाण्यास उशीर होतो. आगारप्रमुख आणि विभाग नियंत्रकांनी तातडीने लक्ष घालून गर्दीच्या वेळी अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन करावे."













