Lanja Murder Case: लांजा तालुक्यातील वृद्धेच्या निर्घृण हत्येप्रकरणी संशयित दूध विक्रेत्लाया ७ दिवसांची पोलीस कोठडी

Lanja Murder Case: लांजा तालुक्यातील वृद्धेच्या निर्घृण हत्येप्रकरणी संशयित दूध विक्रेत्लाया ७ दिवसांची पोलीस कोठडी

कर्जाच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी आणि सोन्याच्या दागिन्यांच्या लोभापोटी रचला होता कट; लांजा पोलिसांकडून अवघ्या काही तासांत प्रकरणाचा छडा

लांजा :
Lanja Murder Case किंवा लांजा तालुक्यातील वेरिवली बुद्रुक लाडवाडी रामगाव येथे घडलेल्या थरारक खुनाचे सत्य आता समोर आले आहे. डोक्यावर वाढलेल्या कर्जाच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी आणि सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी ७६ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या करणाऱ्या प्रमोद खेडेकर या संशयित दूध विक्रेत्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लांजा तालुक्यातील या धक्कादायक खून प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत लांजा पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून गजाआड केले आहे.

Lanja Murder Case: चिकाच्या दुधाचे आमिष दाखवून रचला होता कट
मिळालेल्या माहितीनुसार, दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या प्रमोद खेडेकरवर उलटसुलट आर्थिक व्यवहारांमुळे लोकांचे दोन ते तीन लाख रुपयांचे देणे होते. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्याने गावातील वैशाली विलास हेगिष्टे यांच्या अंगावरील १३ ते १४ तोळे सोन्याचे दागिने लुटण्याचा कट तीन दिवसांपूर्वीच रचला होता. ठरलेल्या बेतानुसार, चिकाचे दूध देण्याचे आमिष दाखवून वैशाली यांच्या मुलीला स्वतःच्या घरी बोलावून घेतले आणि संधी साधत तो थेट वैशाली यांच्या घरी पोहोचला. तिथे त्याने अत्यंत निर्दयीपणे वैशाली यांचे नाक व तोंड दाबून त्यांची हत्या केली. हत्येनंतर त्यांच्या हातातील सोन्याच्या खऱ्या बांगड्या काढून तिथे हुबेहूब दिसणाऱ्या बनावट बांगड्या चढवल्या.

सोन्याचे दागिने फायनान्समध्ये गहाण ठेवून उचलले ६ लाखांचे कर्ज
हत्येनंतर कोणताही संशय येऊ नये म्हणून प्रमोद शांत डोक्याने आपल्या घरी परतला. तोपर्यंत वैशाली यांची मुलगी त्याच्या घरी चिकाचे दूध घेण्यासाठी पोहोचली होती; प्रमोदने तिला दूध देऊन त्याचे पैसेही स्वीकारले. यानंतर एका महिलेच्या मदतीने त्याने ते लुटलेले सोन्याचे दागिने फायनान्समध्ये गहाण ठेवून त्यावर तब्बल सहा लाख रुपयांचे कर्ज उचलले. गुन्हा केल्यानंतर काहीच घडले नाही अशा अविर्भावात वावरणारा प्रमोद पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करत होता.

Khabardar diwali fest

एका जागरूक महिलेच्या साक्षीमुळे लागला प्रकरणाचा छडा
खून उघडकीस आल्यानंतर एका जागरूक महिलेने प्रमोदला त्या वेळी वाडीत फिरताना पाहिल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना दिली. या साक्षीच्या आधारे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी प्रमोदभोवती सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या प्रमोदने खाकीचा हिसका आणि पोलिसी खाक्या पाहताच गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, लांजा पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.