Terav Mobile Tower Agitation: मोबाईल टॉवरविरोधात टेरव ग्रामस्थांचे साखळी उपोषण; कंपनीकडून विरोध डावलून उभारणी केल्याने आंदोलन तीव्र

Terav Mobile Tower Agitation: मोबाईल टॉवरविरोधात टेरव ग्रामस्थांचे साखळी उपोषण; कंपनीकडून विरोध डावलून उभारणी केल्याने आंदोलन तीव्र

लोकवस्तीत टॉवर नको; जिल्हा परिषद बांधकामाकडून रस्त्यापासून मोजणीनंतर पंचायत समिती प्रशासन घेणार अंतिम निर्णय

चिपळूण : Terav Mobile Tower Agitation किंवा चिपळूण तालुक्यातील टेरव येथे मोबाईल टॉवरच्या उभारणीवरून ग्रामस्थ आणि कंपनी प्रशासन यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलेला असतानाही कंपनीने तातडीने टॉवरची उभारणी केल्याने, याविरोधात टेरव ग्रामस्थांनी १६ ऑक्टोबरपासून ग्रामपंचायतीसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. "टॉवरसाठी मोफत जागा देऊ, पण लोकवस्तीत टॉवर नको," या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिल्याने बुधवारी (दि. २१) झालेल्या चर्चेतही कोणताही तोडगा निघू शकला नाही.

Terav Mobile Tower Agitation: लोकप्रतिनिधींची उपोषणस्थळी भेट व अधिकारी पातळीवर चर्चा

ग्रामस्थांनी सुरू केलेल्या या साखळी उपोषणाला जिल्हा परिषद सदस्या नेहा रहाटे व शिवानी सावंत यांनी बुधवारी दुपारी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. या प्रसंगी इंडस टॉवर लिमिटेडचे (Indus Towers Limited) प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य आणि विस्तार अधिकारी मिलिंद केळसकर व भास्कर कांबळे यांच्यात उपोषणकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. उपोषणकर्त्या महिलांनी स्पष्ट केले की, टॉवरच्या उभारणीपूर्वीच लोकवस्तीत टॉवर उभारू नये अशी सूचना केली होती, तरीही ग्रामसभा व ग्रामस्थांचा विरोध डावलून टॉवरचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले.

Smruddhi homes

नियमबाह्य कामाचे आरोप आणि वीजचोरीचा प्रकार

उपोषणकर्त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, जागेवर विजेची अधिकृत व्यवस्था नसतानाही पोलवर आकडा टाकून वीजचोरी करत टॉवरचे काम केले गेले. आम्हाला टॉवरची गरज आहे, मात्र तो इतर ठिकाणी उभारण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यास आम्ही तयार आहोत. यावर कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगण्याचा प्रयत्न केला की, २०१५ पूर्वी टॉवर उभारणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परवानगीची आवश्यकता होती, मात्र आता तशी गरज नाही; तसेच जि. प. रस्त्यापासून ३ मीटर अंतरावर टॉवर उभारण्याचा नियम असून तसाच तो उभारल्याचा दावा कंपनीने केला. मात्र या स्पष्टीकरणाने ग्रामस्थांचे समाधान झाले नाही.

महावितरणकडून वीज जोडणी रोखली; आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय

सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांनी कंपनी प्रतिनिधींची आडमुठी भूमिका डावलून ग्रामस्थांची बाजू मांडली. टॉवर शेजारील रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीचा असल्याने, रस्त्यापासून मोजणी करण्याचे ठरले आहे. तसेच जोपर्यंत कंपनीकडून सर्व परवानग्यांबाबत लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत महावितरणने वीज जोडणी न देण्याचा निर्णय घेतला आहे. जि. प. बांधकाम विभागाकडून रस्त्यापासून टॉवरचे अंतर मोजल्यावर यावर पंचायत समिती प्रशासनाकडून निर्णय घेतला जाईल. तरीही ठोस निर्णय होत नसल्याने साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

यावेळी उपोषणस्थळी ग्रा.पं. अधिकारी रोहिदास हांगे, एकनाथ माळी, रमेश माळी, अनंत कराडकर, संजय तांडळे, महेंद्र खांबे, जयराम म्हालीम, अनंत साळवी, अपर्णा मोरे, सुनील कदम, अशोक कदम, शिरीष कदम, पार्वती भारती, सविता कदम यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.