कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजनारी पुलावर अपघातांची मालिका सुरुच असून गुरुवारी सकाळी सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने मच्छीची वाहतूक करणारा एक कंटेनर पुलावर अचानक पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या सलग घडणाऱ्या अपघातांमुळे अंजनारी पुलावरील सुरक्षेबाबत व रस्त्याच्या रचनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नेमका कसा घडला अपघात?
प्राप्त माहितीनुसार, मुंबईकडून गोव्याच्या दिशेने मच्छीचा साठा घेऊन जाणारा कंटेनर (क्रमांक MH 43 BP 1960) गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अंजनारी पुलावर आला असता हा अपघात घडला. पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भरधाव कंटेनर थेट महामार्गावरच कलंडला. या वाहनाचे चालक प्रेमशंकर यादव (मूळ रा. उत्तर प्रदेश) हे आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार वाडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

अंजनारी पूल ठरतोय ‘ब्लॅक स्पॉट’; स्थानिक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप
विशेष म्हणजे, याच अंजनारी पुलावर सलग दुसऱ्या दिवशी हा अपघात घडला आहे. या ठिकाणी अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून हा पूल वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. रस्त्यावरील वळणाचा अंदाज न येणे, वाहनांची वेगमर्यादा आणि रस्त्याची तांत्रिक रचना यांमुळे येथे सातत्याने अपघात होत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सलग होणाऱ्या या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित रस्ते विकास आणि महामार्ग प्रशासनाने तातडीने या परिसराची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमधून केली जात आहे. या अपघाताचा पुढील तपास अंमलदार वाडकर करत आहेत.













