Kidnapping case Ratnagiri: मजगाव रोड परिसरातून १९ वर्षीय मतिमंद तरुण अपहरणाची घटना; रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल

Kidnapping case Ratnagiri: मजगाव रोड परिसरातून १९ वर्षीय मतिमंद तरुण अपहरणाची घटना; रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल

अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल

रत्नागिरी शहरातील मजगाव रोड लगत असलेल्या कोकण नगर परिसरातून प्रेम प्रवीण खाकोडिया (वय १९) या मतिमंद तरुणाला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणाची आई श्रीमती गंगा प्रवीण खाकोडिया (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना कशी घडली?
प्राप्त माहितीनुसार, मजगाव रोडवरील कोकण नगर, गल्ली क्रमांक ३, अलिशान कॉर्नर येथील रहिवासी असलेल्या गंगा खाकोडिया यांचा १९ वर्षीय मुलगा प्रेम हा मतिमंद आहे. २१ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे चिडचिड करू लागल्याने आईने त्याला घराच्या आवारात फेरफटका मारण्यासाठी बाहेर सोडले होते. काही वेळाने कुटुंबीयांनी बाहेर पाहिले असता प्रेम त्या ठिकाणी आढळून आला नाही.

त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी तातडीने आजूबाजूच्या परिसरात, नातेवाईकांकडे, रत्नागिरी शहर तसेच रेल्वे स्थानक परिसरात त्याचा कसून शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. प्रेम हा स्वतःहून कोठेही जाण्याची शक्यता नसल्याने त्याला अज्ञात कारणासाठी कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून गुप्तपणे पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Smruddhi homes

पोलीस तपास सुरू
मतिमंद तरुण स्वतःहून जाऊ शकत नसल्याने त्याचे अपहरण झाल्याची खात्री पटल्यानंतर आईने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या घटनेमुळे कोकण नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने पुढील कसून तपास करत आहेत.