मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करा; शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केलेल्या खुलाशांनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे. या शिष्टमंडळामध्ये विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार राहुल पाटील, खासदार रवींद्र वायकर आणि दीपक सावंत यांचा समावेश होता. शिवसेना नेत्यांच्या या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT) चौकशी करण्याची मागणी केली असून, मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती नेत्यांनी दिली आहे.
सचिन अहिर काय म्हणाले?
या भेटीबाबत बोलताना विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर म्हणाले की, मनोज जरांगे यांनी कोणतेही तथ्य नसलेले आणि नाहक आरोप केले आहेत. यापूर्वीच या आरोपांचे खंडन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे, परंतु पक्ष म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सायबर क्राईम आणि इंटेलिजन्स यंत्रणेच्या माध्यमातून या प्रकरणाची कागदपत्रे व सत्यता पडताळून लवकरात लवकर वस्तुस्थिती समोर आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही लोक स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अशा पद्धतीचे निराधार आरोप करत आहेत, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आश्वासन दिल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.

राहुल शेवाळे यांचे गंभीर आरोप आणि चौकशीची मागणी
माजी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केलेली कथित ऑडिओ क्लिप अतिशय निंदनीय आणि बदनामीकारक आहे. या ऑडिओ क्लिपमधील संभाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविषयी केलेली वक्तव्ये आक्षेपार्ह असून, यामागे काही मोठे कटकारस्थान किंवा राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव आहे का, याची सत्यता तपासली पाहिजे.
या कथित क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल एका महिलेने केलेल्या वक्तव्याची विशेष दखल घेणे आवश्यक आहे. ती महिला कोण आहे, तिने ही विधाने कोणत्या आधारावर केली आणि तिला ही माहिती कोणी पुरवली, याची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या क्लिपमध्ये काही नेत्यांच्या आणि व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असून, त्यात आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अतुल, निखिल, श्वेताजी, गिरीष, अजय, जितेनभाई, सुशीलकुमार आणि पावरा या व्यक्ती नेमक्या कोण आहेत, त्यांची राजकीय संलग्नता व भूमिका काय आहे, हे तपासावे, असे शेवाळे यांनी म्हटले आहे. महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांची बदनामी करणाऱ्यांना कोणतेही राजकीय संरक्षण मिळू नये, अशी आमची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.













