महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांना पाठिंबा
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नितेश कराळे मास्तर (Nitesh Karale Master) यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर पक्षशिस्तीचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना तब्बल ६ वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केले आहे. तसेच, पक्षाने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, याबाबतचे अधिकृत पत्र पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.
बंडखोरी आणि संभ्रम निर्माण केल्याचा ठपका
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अधिकृत निर्णयाविरुद्ध जाऊन नितेश कराळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. विशेष म्हणजे, प्रचारादरम्यान आपल्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याचा खोटा किंवा दिशाभूल करणारा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण करण्यात येत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सोशल मीडियावर आपल्या अनोख्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चा Rरहणारे कराळे गुरुजी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडीविरोधात भूमिका घेत प्रचार करत होते. ही सर्व कृती पक्षाची धोरणे, शिस्त आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत निर्णयांचे स्पष्ट उल्लंघन करणारी असल्याने वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानुसार ही हकालपट्टी करण्यात आल्याचे पक्षाच्या पत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारींना पाठिंबा आणि निवडणुकीवरील परिणाम
मतदानाच्या अवघ्या काही तास आधी पक्षाने ही कठोर कारवाई केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपले बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांच्यावर कारवाई करत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या पाठीशी पक्ष पूर्ण ताकदीने उभा असल्याचे दाखवून दिले आहे. या अखेरच्या टप्प्यातील नाट्यमय घडामोडींचा नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालावर नेमका काय परिणाम होतो, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तूळाचे लक्ष लागून राहिले आहे.













