“देशात गडबड करणारा अजून जन्माला यायचा आहे”; राज ठाकरेंच्या विधानावर मंत्री गुलाबराव पाटलांचा पलटवार

"देशात गडबड करणारा अजून जन्माला यायचा आहे"; राज ठाकरेंच्या विधानावर मंत्री गुलाबराव पाटलांचा पलटवार

राज ठाकरेंच्या ‘मोठ्या गडबडीच्या’ भाकितावर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर; संजय राऊत यांच्यावरही साधला निशाणा

देशात पुढील काही महिन्यांत मोठी गडबड होईल आणि देशामध्ये पंतप्रधानच उरणार नाहीत, असे खळबळजनक भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत थेट आव्हान देत जोरदार पलटवार केला आहे. देशात गडबड करणारा अजून कोणता माईचा लाल जन्माला यायचा आहे, हे नरेंद्र मोदींचे सरकार असून कोणी गडबड केल्यास थेट पाकिस्तानात जाऊन ठोकू, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. या राजकीय वाक् युद्धामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

नेमके काय म्हणाले होते राज ठाकरे?
यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील निवडणुकांच्या पद्धतीवर आणि भविष्यातील राजकीय परिस्थितीवर मोठे भाष्य केले होते. देशातील निवडणुका पूर्णपणे पारदर्शक झाल्या पाहिजेत, असा आग्रह धरत त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळसारख्या देशांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होत असल्याचे सांगितले होते. तसेच जगाने ईव्हीएम (EVM) नाकारले असताना भारतात त्याचा वापर का होतो, असा सवाल करत फ्रान्सचे उदाहरण दिले होते. पुढच्या ४ ते ५ महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होणार हे निश्चित असून देश रस्त्यावर उतरला तरी मला नवल वाटणार नाही, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता.

संजय राऊत म्हणजे वापरलेली कॅसेट – गुलाबराव पाटील
दसरा मेळाव्यातील भाषणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली. "संजय राऊत म्हणजे वापरलेली कॅसेट आहे," असे म्हणत त्यांनी राऊतांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व दिले नाही. प्रत्येकाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावासा वाटणे स्वाभाविक आहे, मग मी माझी भूमिका मांडली यात चूक काय? असा सवाल त्यांनी केला. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची आमदार किंवा मंत्री होण्याची इच्छा असते आणि मी ती पूर्ण करून दाखवली आहे, असेही ते म्हणाले.

Arihant 2

पाणीटंचाई आणि दुष्काळमुक्तीसाठी नियोजनाचे आवाहन
या राजकीय घडामोडीঁसोबतच पाणीटंचाईच्या मुद्द्यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. पुढचा काळ हा पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून नागरिकांनी काटकसरीने जीवन जगणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. शासन दुष्काळ जाहीर केल्यानंतर नियमानुसार मदत करेलच, परंतु पाणी वाचवणे आणि त्याचे योग्य नियोजन करणे आपल्या हातात आहे. जळगाव जिल्ह्यात ‘जलतारा’ उपक्रमांतर्गत २५ हजार कामे हाती घेण्यात येत असून, भूजल पातळी वाढवण्यासाठी नाला खोलीकरण आणि सिमेंट प्लग बांधण्यासारख्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागेल, असे आवाहन त्यांनी केले. १९७२ च्या दुष्काळात जशी ‘रोजगार हमी योजना’ जन्माला आली, तशीच आपल्याला आता दुष्काळावर मात करण्यासाठी ठोस तयारी करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.