२०२६-२७ हंगामासाठी आंबा पिकाचा विमा हप्ता १३,६०० रुपयांवरून ८,५०० रुपयांपर्यंत कमी
*रत्नागिरी *: दुष्काळाचे संकट, हवामानातील वाढती अनिश्चितता आणि आंबा उत्पादनावरील वाढता खर्च यामुळे चिंतेत असलेल्या कोकणातील आंबा बागायतदारांना शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सन २०२६-२७ हंगामासाठी आंबा पिकाचा विमा हप्ता प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपयांवरून थेट ८ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हेक्टरी ५ हजार १०० रुपयांची थेट बचत होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
विमा संरक्षणाच्या कालावधीत वाढ आणि महत्त्वाचे बदल
विमा हप्ता कमी झाल्यामुळे आंबा उत्पादकांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होणार असून, अधिकाधिक शेतकरी विमा संरक्षणाच्या कक्षेत येण्यास मोठी मदत होणार आहे. कोकणातील आंबा बागायतदारांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय, आंबा पिकासाठी विमा संरक्षणाचा कालावधी १५ मे ऐवजी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस होणारा अवकाळी पाऊस, वादळी वारे किंवा इतर प्रतिकूल हवामान बदलांमुळे होणाऱ्या नुकसानािरुद्ध शेतकऱ्यांना अधिक काळ संरक्षण मिळणार आहे.

नारळ व सुपारी पिकाचा प्रथमच समावेश
या विशेष फळपीक विमा योजनेत प्रथमच नारळ व सुपारी या पिकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील विविध फळबाग उत्पादकांना विमा संरक्षणाची हक्काची संधी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांसाठी विमा हप्तातील ही कपात अत्यंत दिलासादायक ठरणार असली, तरी या योजनेचा लाभ अधिसूचित क्षेत्र, पात्रता निकष आणि विमा अटींनुसारच मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.













