एकाच दिवसात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम ऑनलाइन वर्ग
*रत्नागिरी : *महाराष्ट्र राज्य कोरड्या दुष्काळाचा सामना करत असताना ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला त्याची मोठी झळ सोसावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करून भरलेले शुल्क परत करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांची तत्परतेने अंमलबजावणी करत पाली (ता. रत्नागिरी) येथील डी. जे. सामंत सिनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयाने आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क अवघ्या एका दिवसात थेट त्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा केले आहे.
उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सूचनेनुसार अंमलबजावणी
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उदय सामंत यांच्या विशेष सूचनेनुसार ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेगाने पार पडली. रत्नागिरी तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त क्षेत्रात झाल्यामुळे मुंबई विद्यापीठाने तालुक्यातील महाविद्यालयांना परीक्षा शुल्क परत देण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. या निर्णयाची तातडीने दखल घेत डी. जे. सामंत महाविद्यालयाने एकाच दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या खात्यात शुल्क वर्ग केले. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून तीव्र समाधान व्यक्त केले जात आहे.
ग्रामीण भागातील शिक्षणासाठी २५ वर्षांचे योगदान
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी गावातच उपलब्ध व्हावी, यासाठी डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून २५ वर्षांपूर्वी श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेअंतर्गत डी. जे. सामंत सिनियर कॉलेज, आय.टी.आय. आणि इंग्लिश मीडियम स्कूल चालवले जाते. ग्रामीण विद्यार्थ्यांचा शहरात जाण्याचा त्रास व आर्थिक भार कमी व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. दुष्काळी परिस्थितीत पालकांना आर्थिक चणचण भासत असताना, मिळालेल्या या निर्णयामुळे आणि शुल्क परत मिळाल्याने पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.














