नगर परिषदेच्या जागेचा ताबा मिळवण्याच्या अर्जावर जिल्हा सहाय्यक आयुक्तांचे पालिकेला आदेश
चिपळूण शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या मार्कडी येथील सी. एस. नंबर २६५६ या जागेचा ताबा घेण्याच्या मागणी प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून आवश्यक कागदपत्रांसह सविस्तर अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हा सहाय्यक आयुक्त वैभव गारवे यांनी चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.
नेमके प्रकरण काय आहे?
चिपळूण शहरातील ही कोट्यवधी रुपये किमतीची जागा सध्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या (लक्ष्मी ट्रेडर्स, मेहता पेट्रोल पंप) माध्यमातून वापरात असल्याचे समोर आले आहे. या जागेचा भाडेपट्टा आणि त्यानंतर देण्यात आलेली मुदतवाढ संपल्याचा दावा करत इनायत मुकादम यांनी ही जागा नगर परिषदेने आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला होता.

या तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची प्राथमिक शहानिशा करून आवश्यक ती कारवाई करण्याचे सुचवले आहे. जर कारवाई करणे अपेक्षित असेल तर स्वयंपस्पष्ट अभिप्रायासह वस्तुस्थितीदर्शक मुद्देनिहाय सविस्तर अहवाल आणि सर्व संबंधित कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी लागणार आहेत. तसेच, अर्जदाराला परस्पर कळवून पूर्तता अहवालही सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.













