नवरात्रोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा असगोली गावात डल्ला; पोलिसांपुढे तपासाचे आव्हान
गुहागर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या असगोली गावामध्ये नवरात्रोत्सवाच्या धुमधडाक्यात घरफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. गावात एका बाजूला भजनाची डबलबारी आणि दांडियाचा कार्यक्रम सुरू असताना चोरट्यांनी बंद आणि दुर्लक्षित घरांना लक्ष्य केले. १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी सलग दोन दिवस झालेल्या या चोऱ्यांमुळे असगोली आणि आसपासच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसले असून, या चोरट्यांचा सुगावा लावून त्यांना गजाआड करण्याचे मोठे आव्हान गुहागर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
पहिली घटना: भजनाची डबलबारी सुरू असताना खिडकीची जाळी कापून हार लांबवला
प्राप्त माहितीनुसार, असगोली येथील श्री व्याघ्रांबरी मंदिरासमोरील प्रांगणात नवरात्रोत्सवानिमित्त १८ ऑक्टोबर रोजी भजनाच्या डबलबारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामस्थ या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यात मग्न असतानाच चोरट्याने याच परिसरातील मनश्री महेश असगोलकर यांच्या घराला लक्ष्य केले. चोरट्याने घराच्या स्लायडिंग खिडकीची जाळी कापून आत प्रवेश केला आणि कपाटाचे कुलूप फोडून आत ठेवलेला १ ग्रॅम सोन्याचा हार चोरून नेला.
दुसरी घटना: दांडियाच्या रात्री २ तोळ्यांची सोन्याची साखळी गायब
पहिल्या घटनेचा तपास सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १९ ऑक्टोबर रोजी गावात नवरात्रोत्सवाचा दांडिया कार्यक्रम सुरू होता. या गर्दीचा व कोलाहलाचा फायदा घेत चोरट्याने याच परिसरातील रेवती सुरेश धोपावकर यांच्या घरावर डोळा ठेवला. घरातील लॉक नसलेल्या कपाटाचा फायदा उठवत चोरट्याने आत ठेवलेली तब्बल दोन तोळ्यांची सोन्याची चेन सहजरीत्या लांबवली.

गुहागर पोलिसांत तक्रार दाखल; पोलिसांची प्रतिष्ठा पणाला
सलग दोन दिवस घडलेल्या या चोरीच्या प्रकारांमुळे असगोली गावात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आहे. नवरात्रोत्सवासारख्या सार्वजनिक सणाच्या काळात चोरट्यांनी दाखवलेल्या या धैर्यामुळे स्थानिक पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत असून, चोरट्यांचा छडा लावण्यात गुहागर पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास गुहागर पोलीस करत आहेत.













