Raj Thackeray on audio clip: “हा लोकशाहीचा खून आणि बलात्कार”; ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Raj Thackeray on audio clip: "हा लोकशाहीचा खून आणि बलात्कार"; ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावर राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट; निष्पक्ष चौकशीची मागणी

*मुंबई *: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ५०० कोटींच्या देवाण-घेवाणीची कथित ऑडिओ क्लिप समोर आणल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, ही क्लिप दोन वर्षे जुनी असल्याची शंका उपस्थित केली आहे. या संपूर्ण वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. ही कथित क्लिप म्हणजे लोकशाहीचा खून आणि बलात्कार असल्याचे म्हणत, मुख्यमंत्र्यांनी यात निष्पक्ष कारवाई करून दाखवावी, असे आव्हान राज ठाकरेंनी दिले आहे.

‘फ्रेंडशिप फाईल’ आणि सोशल मीडियावरील दडपशाहीवर भाष्य
राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये सध्या व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपला ‘फ्रेंडशिप फाईल’ असे संबोधले आहे. भाजपचे काही पदाधिकारी, सोशल मीडियातील महत्त्वाच्या व्यक्ती, संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे काही युट्युबर्स यांच्यातील संभाषणाचा यात समावेश असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या क्लिपमध्ये ५०० कोटींच्या देवाण-घेवाणीसोबतच माध्यमांवर कशी जरब बसवायची, भावनिक मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष कसे भडकावायचे आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे मुद्दे कसे रेटायचे, याची चर्चा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील ५०० कोटींच्या मुद्द्यावर खुलासे यायलाच पाहिजेत, परंतु भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने समाजमाध्यमांवर दडपशाही आणत आहे, त्यावरही चर्चा झाली पाहिजे, असे राज म्हणाले.

फॉरेन्सिक अहवालावरून मुख्यमंत्र्यांना सवाल
मुख्यमंत्र्यांनी या ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला असल्याचे सांगत, राज ठाकरेंनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ-व्हिडिओच्या सत्यतेसोबतच गंभीर गुन्ह्यांमध्ये मागवला जातो, आणि हे संभाषण ऐकल्यानंतर हा लोकशाहीचा खून व बलात्कारच वाटतो, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप दोन वर्षे जुनी असावी आणि ती आताच का बाहेर आली? यावर बोलताना राज ठाकरेंनी, ही क्लिप बाहेर आली कशी आणि कुणी आणली, यामागे सरकारमधील ‘शहा-काटशाहाचे’ राजकारण असल्याचा संशय व्यक्त केला.

Shanti 4

महाराष्ट्राला जे समजायचे होते ते समजले असून, या प्रकरणात तांत्रिक गोष्टींमध्ये गोल-गोल न फिरवता मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि कशी कारवाई करता, हे महाराष्ट्राला दाखवून द्या, असा थेट वार राज ठाकरेंनी केला आहे. अन्यथा हा फॉरेन्सिक अहवाल तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानेही गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची सायबर आणि फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी केली असून, मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे.