Manoj Jarange vs Ramdas Kadam: “रामदास कदम, तुम्ही फोटोग्राफर होता का?” : फोटो दाखवल्यानंतर मनोज जरांगेंचा घणाघाती पलटवार; दिला थेट इशारा

Manoj Jarange vs Ramdas Kadam: "रामदास कदम, तुम्ही फोटोग्राफर होता का?" : फोटो दाखवल्यानंतर मनोज जरांगेंचा घणाघाती पलटवार; दिला थेट इशारा

जरांगे विरुद्ध रामदास कदम सामना पेटला : "माझ्याविषयी बोलू नका, नाहीतर मी सुरू होईन"; जरांगेंचा कडक शब्दांत इशारा

*मुंबई : *मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या ५०० कोटींच्या खळबळजनक आरोपानंतर आणि कथित ऑडिओ क्लिप जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण भडकले आहे. या प्रकरणावरून आता मनोज जरांगे पाटील विरुद्ध शिवसेना नेते रामदास कदम असा थेट सामना पाहायला मिळत आहे. रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांचे भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासोबतचे एकत्र जेवतानाचे फोटो दाखवल्यानंतर जरांगे पाटील यांनी त्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. "रामदास कदम तुम्ही काय फोटोग्राफर होता का? विनाकारण शिंदेंच्या मागे तुम्ही साडेसाती लावली आहे," असा टोला लगावत त्यांनी कदम यांना थेट इशारा दिला आहे.

"क्लिप बाहेर काढल्यामुळे उलट शिंदेसाहेब सावध झाले"
पत्रकार परिषदेत रामदास कदमांच्या आरोपांना उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "मला जर एकनाथ शिंदेंना संपवायचे असते, तर मी ही ऑडिओ क्लिप अशी समोर आणली असती का? मी क्लिप बाहेर काढल्यामुळे उलट शिंदे साहेब सावध झाले आहेत. आता ते स्वतः शोधून काढतील की हे कोण लोक आहेत, जे त्यांची आणि त्यांच्या मुलाची (खासदार श्रीकांत शिंदे) बदनामी करत आहेत." पुढे बोलताना त्यांनी कदमांना सवाल केला की, "तुम्हाला या क्लिपची तारीख कशी समजली, हे आधी फडणवीस आणि शिंदे साहेबांना सांगा. हे सगळे एकप्रकारचे गौडबंगाल आणि कोडं आहे. त्यामुळे मला धमक्या देणे बंद करा."

"माझ्याबद्दल बोलू नका, नाहीतर मीही सुरू होईन" – जरांगे यांचा अंतिम इशारा
रामदास कदम यांच्या वयाचा आदर राखत मनोज जरांगे यांनी त्यांना शेवटचा इशारा दिला. ते म्हणाले, "मी तुमचा वयाने मोठे आहात म्हणून आदर करतो, पण यापुढे माझ्याबद्दल काहीही बोलू नका, माझ्या डोक्यात जाऊ नका. प्रसाद लाड जेवायला आले तर ही तुमची पोटदुखी आहे का? मी उदय सामंतांशी बोललो की ते तुमचे मित्र म्हणणार, प्रसाद लाडांशी बोललो की वेगळा आरोप करणार. मी काय तुमचा नोकर आहे का?"

Happy journey marathi

आपल्या वक्तव्याचा शेवट करताना जरांगे यांनी, "रामदासभाई, मी तुमचा आदर करतो, पण तुमच्या मुलाने आणि तुम्ही नीट बोलायला शिकले पाहिजे. माझ्याविषयी बोलणे थांबवा, नाहीतर मी एकदा सुरू झालो तर कठीण होईल," असा कडक इशारा देत या वादाला आणखी तोंड फोडले आहे.