ऑडिओ क्लिप प्रकरणावर भाजप आमदार परिणय फुके यांची प्रतिक्रिया; संजय राऊतांच्या टीकेचाही घेतला समाचार
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ५०० कोटींच्या देवाण-घेवाणीची कथित ऑडिओ क्लिप जाहीर केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणावर आता भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी दाखवलेली ती ऑडिओ क्लिप खोटी असून ती कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या माध्यमातून तयार केलेली असावी, असा दावा फुके यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सत्यतेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, जर क्लिप खरी ठरल्यास त्यावर नक्कीच कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
क्लिप चुकीच्या पद्धतीने बनवली गेल्याचा संशय
या प्रकरणावर बोलताना आमदार परिणय फुके म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार या क्लिपची सत्यता तपासली जाईल. मात्र, प्राथमिक पाहणीत ही क्लिप चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचे व यात एखाद्याचा आवाज एडिट करून टाकल्याचे वाटते. ही ऑडिओ क्लिप पूर्णपणे एआय (AI) च्या माध्यमातून बनवली असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, या प्रकरणी शिंदेसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन सायबर आणि फॉरेन्सिक यंत्रणेमार्फत सखोल तपास करण्याची मागणी केली असून, मुख्यमंत्र्यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद देत चौकशीचे आश्वासन दिले आहे.
संजय राऊतांच्या भूमिकेवर खोचक टीका
या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना परिणय फुके यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय किंवा कामे करतात, त्यावर संजय राऊत यांचे नेहमीच आक्षेप असतो आणि प्रत्येक विषयावर टीका करणे हे त्यांचे रोजचे काम बनले आहे. त्यांच्या पक्षाने त्यांना सकाळी ९ वाजता उठून भोंगा वाजवण्याचे काम दिले आहे आणि ते तेच करत असतात, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, आतापर्यंत अनेक प्रकरणांत एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आल्या आहेत, परंतु एसआयटीबाबत विरोधकांचे वर्तन नेहमीच राजकीय स्वार्थाचे असते, असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेचा समाचार घेतला.














