Super Napier grass cultivation Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात २.८७ लाख सुपर नेपियर ठोंबांची मागणी; सोलापूर जिल्ह्यातून होणार पुरवठा

Super Napier grass cultivation Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात २.८७ लाख सुपर नेपियर ठोंबांची मागणी; सोलापूर जिल्ह्यातून होणार पुरवठा

दुष्काळात जनावरांसाठी चारा उपलब्धतेसाठी पशुसंवर्धन विभागाचे नियोजन; सोलापूरच्या महूद येथून वाहनांद्वारे पुरवठा

*रत्नागिरी *: जिल्ह्यात ओढावलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी हिरव्या वाळलेल्या चाऱ्याची टंचाई भासू नये, म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून मोठे नियोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांसाठी मिळून तब्बल २ लाख ८७ हजार १५ सुपर नेपियर ठोंबांची (चारा लागवडीसाठी लागणारे रोप) मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या महूद (जि. सोलापूर) येथील प्रक्षेत्र व्यवस्थापकांना संबंधित विभागाकडून अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या वाहनांद्वारे ठोंब रत्नागिरीत दाखल

जिल्ह्यातील जनावरांना पोषक हिरवा चारा सहज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने सुपर नेपियर गवत लागवडीला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. सांगली जिल्ह्यातून ठोंब उपलब्ध होऊ शकत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील महूद येथून या ठोंबांचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी ईशर (Eicher) कंपनीच्या मोठ्या वाहनांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर रोजी या वाहनांतून ठोंब पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सुपर नेपियर गवत हे जनावरांच्या चाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त पर्याय मानले जात असल्याने दुष्काळी परिस्थितीत चारा व्यवस्थापनाला यामुळे मोठी मदत होणार आहे.

Infigo eyecare

लांजा आणि राजापूर तालुक्यातून सर्वाधिक मागणी

जिल्ह्यातील सर्व नऊ तालुकानिहाय मागणी निश्चित करण्यात आली असून, यामध्ये लांजा आणि राजापूर तालुक्यातून सर्वाधिक मागणी नोंदवण्यात आली आहे.

तालुकानिहाय मागणीचा तपशील:

लांजा: ७३ हजार

राजापूर: ६७ हजार

रत्नागिरी: ५६ हजार २७५

संगमेश्वर: ३५ हजार

चिपळूण: १८ हजार

खेड: १५ हजार

दापोली: १० हजार २००

मंडणगड: ६ हजार ३००

गुहागर: ६ हजार ६२०

मागणी केलेल्या ठोंबांचा प्रत्यक्ष पुरवठा झाल्यानंतर त्यांचे तालुकानिहाय वितरण आणि प्रत्यक्ष शेतात लागवडीची कारवाई वेगाने पूर्ण करणे हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.