Ratnagiri Teacher Transfer: रत्नागिरी शिक्षक बदली फेर समायोजन प्रक्रियेतून १७१ शिक्षकांच्या बदल्या जाहीर; ५३ वर्षांवरील ज्येष्ठ शिक्षकांना दिलासा

Ratnagiri Teacher Transfer: रत्नागिरी शिक्षक बदली फेर समायोजन प्रक्रियेतून १७१ शिक्षकांच्या बदल्या जाहीर; ५३ वर्षांवरील ज्येष्ठ शिक्षकांना दिलासा

पालकमंत्री उदय सामंत आणि प्रशासकीय हस्तक्षेपाने सुटला पेच; दूरवरच्या शाळांऐवजी सेवाज्येष्ठतेनुसार दिलासा

रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागात रखडलेली शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून फेर समायोजनानुसार एकूण १७१ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या नव्या निर्णयामुळे वर्षानुवर्षे ग्रामीण भागात प्रामाणिक सेवा देऊन निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या ५३ वर्षांवरील ज्येष्ठ शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि बैठकीतील निर्णयांमुळे ज्येष्ठ शिक्षकांवर होणारा संभाव्य अन्याय टळला आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या बदल्यांच्या प्रक्रियेत सुरुवातीला मोठा गोंधळ निर्माण झाला होता. काही शिक्षक संघटनांचा प्रभाव आणि प्रशासकीय धोरणांमुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या ५३ वर्षांवरील शिक्षकांना दूरवरच्या व दुर्गम भागातील शाळांमध्ये पाठवण्याची तयारी सुरू होती. आयुष्याची ३० ते ३५ वर्षे शिक्षण क्षेत्रात घालवलेल्या शिक्षकांना वयाच्या शेवटच्या टप्प्यात अशा प्रकारच्या बदल्यांना सामोरे जावे लागत असल्याने शिक्षक वर्गातून तीव्र आक्षेप घेण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी शिक्षण विभागातील अधिकारी आणि संबंधित संघटनांची खरडपट्टी काढली होती.

यापूर्वी जिल्ह्यात हजाराहून अधिक शिक्षक अतिरिक्त असताना अचानक ४५० नवीन शिक्षकांच्या नियुक्तीचा घाट का घातला गेला, असा प्रश्न पीडित शिक्षकांकडून उपस्थित केला जात होता. तसेच नवीन भरतीनंतर जुन्या शिक्षकांचे समायोजन करताना वय, सेवाज्येष्ठता आणि नियमांना बगल दिल्याचा आरोप होत होता. पालकमंत्र्यांनी ५३ वर्षांवरील शिक्षकांना सहानुभूतीपूर्वक विचार करून सोयीच्या शाळा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश आधीच दिले होते; मात्र काही अधिकाऱ्यांनी आणि संघटनांच्या दबावाने वेगळी व्यवस्था निर्माण केल्याने हा प्रश्न चिघळला होता.

Arihant 3

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी शिक्षण विभागासोबत तातडीची संयुक्त बैठक घेतली. प्रारंभी केवळ १०३ अर्जांची छाननी पूर्ण झाली होती, परंतु फेर समायोजन प्रक्रियेमुळे बदली अर्जांची संख्या वाढली. या बैठकीत संघटनांचा दबाव आणि प्रशासकीय त्रुटी बाजूला सारत सेवाज्येष्ठतेनुसार निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. या सकारात्मक भूमिकेमुळे अखेर १७१ शिक्षकांच्या फेर समायोजन बदल्यांचा मार्ग सुकर झाला आणि ज्येष्ठ शिक्षकांना हक्काच्या सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळाली.