Gogate Jogalekar College News: मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला रौप्यपदक

Gogate Jogalekar College News: मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला रौप्यपदक

५९ व्या युवा महोत्सवात मराठी स्किट स्पर्धेत पटकावला दुसरा क्रमांक; विद्यार्थ्यांच्या अभिनयाचे आणि सादरीकरणाचे कौतुक

रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने आपल्या सांस्कृतिक यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवात दणदणीत यश संपादन केले आहे. विविध कला आणि वक्तृत्व स्पर्धांनी रंगलेल्या या महोत्सवातील मराठी स्किट प्रकारात महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर रौप्यपदक पटकावले. कोकणातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असलेल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आणि सांघिक समन्वयाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

मराठी स्किट स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आशयपूर्ण लेखन, संवादफेक आणि रंगमंचावरील सहज वावराच्या जोरावर परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकाचे लेखन कुंदन सागवेकर व यतीन पवार यांनी केले असून, दिग्दर्शनाची धुरा यतीन पवार यांनी सांभाळली होती. कल्पक विषयाची मांडणी, पात्रांची सुयोग्य उभारणी आणि प्रभावी दिग्दर्शन यांमुळे स्किटला विशेष पसंती मिळाली. रंगमंचावर तन्मय डांगे, अथर्व पवार, राज शिंदे, कुंदन सागवेकर, सोहम नारकर आणि सार्थक चव्हाण यांनी कलात्मक अभिनय करत या यशात मोलाचा वाटा उचलला.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (BPA) नाट्य विभागाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रा. ओंकार रसाळ, प्रा. आर्या वंडकर, प्रा. साई जिरोळे आणि BPA विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक व अभिनयाचे धडे दिले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय दरवर्षी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात विविध सांस्कृतिक उपक्रमांत आघाडीवर असते. यंदाच्या मराठी स्किटमधील रौप्यपदकामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील उपक्रमांना पुन्हा एकदा नवी झळाळी मिळाली आहे.

Shanti 4

या दैदिप्यमान यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे विशेष अभिनंदन केले आहे.