बळवंत पाटील विकासवाडी परिसरातील घटना; पश्चिम बंगाल येथील नागरिक जखमी
Chiplun Crime News अंतर्गत तालुक्यातील खेर्डी येथील बळवंत पाटील विकासवाडी परिसरात गॅस सिलेंडर देण्याच्या किरकोळ वादातून एका ४२ वर्षीय व्यक्तीवर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी सहीदुल अमीरुद्दीनमिया हक (वय ४२, मूळ रा. उनिसबिशा, ता. घोकशादंगा, जि. कुचबिहार, पश्चिम बंगाल) हे सध्या खेर्डी येथील बळवंत पाटील विकासवाडी भागात भाड्याच्या खोलीत राहतात. घटनेच्या वेळी ते रात्रीचे जेवण आटोपून आपल्या खोलीत विश्रांती घेत होते. त्यावेळी आरोपी अब्बास मिया (वय ४७), मनिजा बीबी (वय ४५) आणि राजीव मिया (वय २१, सर्व रा. खेर्डी, ता. चिपळूण) हे त्यांच्या खोलीत आले आणि त्यांनी वापरात असलेला गॅस सिलेंडर लगेच देण्याचा तगादा लावला.
फिर्यादी सहीदुल हक यांनी दुसऱ्या दिवशी सिलेंडर देतो, असे सांगत एक दिवसाची मुदत मागितली. यावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादावादी वाढल्यानंतर आरोपी अब्बास मिया याने स्वयंपाकघरातील मसाला कुटण्याच्या लोखंडी रॉडने फिर्यादींच्या डोक्यात वार केला. त्यानंतर राजीव मिया याने तोच रॉड हातात घेऊन फिर्यादींच्या डाव्या खांद्यावर मारहाण केली. तसेच मनिजा बीबी हिने झाडूने मारहाण करत अश्लील शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे १:५५ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा सखोल तपास करत आहेत.













