‘तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार…’ रामदास कदमांच्या आरोपांवर मनोज जरांगे आक्रमक
Manoj Jarange Patil News नुसार, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल एक ऑडिओ क्लिप ऐकवून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदेंनी जरांगेंना देण्यासाठी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा या क्लिपमध्ये उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाने केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडींवर शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आणि आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, जरांगे आंदोलनामध्ये झोपण्यासाठी कफ सिरपचे सेवन करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच त्यासाठी काही फोटोंचा दाखलाही दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे यांनी ‘एबीपी माझा’ आणि पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक शब्दांत रामदास कदमांना डिवचले. "तूच ती बाटली पिऊन बघ, कशाची बाटली आहे तुला कळेल. तुझ्याकडेच बार आहेत, तुला त्याची चव चांगलीच कळते," असे म्हणत जरांगेंनी एकेरी भाषेत टीका केली. तसेच रामदास कदम हे शिवसेना संपवायला निघाले आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
रामदास कदमांवर गंभीर आरोप आणि सवाल
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी रामदास कदमांना थेट इशारा दिला. "आम्ही तुम्हाला विचारत आहोत की, त्या आंदोलनाची तारीख तुम्हाला कशी माहिती झाली? ती क्लिप व्हायरल कशी झाली, हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा. मीडियावर धमकी देऊ नका आणि डोक्यात जाऊ नका. तू शिंदे साहेबांना संपवू नको, ती तारीख तूच सांगितली का? तूच आमचे लोक फोडले का? जर तू मोघम बोलायला सुरुवात केलीस, तर मी देखील गप्प बसणार नाही," अशा शब्दांत जरांगेंनी संताप व्यक्त केला. चिल्लर माणसासारखा व्यवहार करू नका, असेही ते म्हणाले.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मनोज जरांगे यांच्यावर सुपारी घेऊन काम करत असल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, "तुझ्या म्हाताऱ्याने काय केले, तो कोणाची सुपारी घेतो, तुझ्या घरीच सुपारी आहे. आम्हाला एकनाथ शिंदेंचा स्वाभिमान होता, म्हणून आम्ही त्यांना डोक्यावर घेतले. आमच्यासोबत गद्दार कोण होता, ते सांगावे," असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
संजय राऊत यांच्याशी तुलना आणि ‘क्रॅक जॅक’ टीका
रामदास कदम यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, "रामदास कदम म्हणजे ‘क्रॅक जॅक’ संघटना आहे. मी भिंती उभी करत नाही, तर मराठ्यांमध्ये आणि शिंद्यांमध्ये गैरसमज पसरवून एकनाथ शिंदेंना डॅमेज करण्याचे काम स्वतः रामदास कदम करत आहेत. शंभर टक्के त्यांना एकनाथ शिंदेंनी बोलायला सांगितलेले नाही." आमच्या विरोधात राहून बरेच फोटो काढले गेले आहेत, तू काय फोटोग्राफर होतास का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. याशिवाय, शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना जरांगे म्हणाले की, "संजय राऊत तरी बरा आहे, तो एकदाच सकाळी बोलतो. संजय राऊत इमानदार आहे, त्याने जेल भोगली पण मागे हटला नाही, पण हे (रामदास कदम) खूपच वेगळ्या मानसिकतेचे आहेत," असे म्हणत त्यांनी राजकारणात नवीन चर्चांना तोंड फोडले आहे.













