रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दल आणि नेरूळ गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; आरोपीकडून कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त
Konkan Railway Theft Case मधील एका खळबळजनक घटनेत, रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने (STF) आणि नेरूळ युनिट गुन्हे शाखेने संयुक्त मोहीम राबवून मध्य प्रदेशातून अटक केली आहे. कृष्णकुमार पांडे (वय ४०) असे या सराईत चोरावलेचे नाव असून, त्याच्याकडून तब्बल ४८ लाख ३० हजार ७९० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि दोन महागडे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. तांत्रिक विश्लेषन आणि खबऱ्यांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई फत्ते केली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बोरिवली येथे राहणारे रणजित चव्हाण (वय ६२) हे ९ ऑक्टोबर रोजी आपल्या कुटुंबासह सावंतवाडी – सीएसएमटी एक्सप्रेसने प्रवास करत होते. चिपळूण रेल्वे स्थानकातून रेल्वेगाडीत चढल्यानंतर त्यांच्या पत्नीने सोन्याचे दागिने आणि दोन मोबाइल असलेली तपकिरी रंगाची पर्स प्रवासादरम्यान उशीखाली ठेवली होती. दरम्यान, प्रवासात गाढ झोप लागल्याची संधी साधत चोराने ती पर्स लांबवली. जेव्हा रेल्वेगाडी पनवेल रेल्वे स्थानकात पोहोचली, तेव्हा चोरी झाल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोराविरुद्ध तक्रार दाखल केली.
सराईत आरोपीचा मध्य प्रदेशपर्यंत माग
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली एसटीएफ आणि नेरूळ युनिट गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. सायबर आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा माग काढला. मुख्य आरोपी कृष्णकुमार पांडे हा मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद भागात लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एसटीएफचे पथक तातडीने मध्य प्रदेशमधील सतना येथे रवाना झाले. तेथील स्थानिक नागौद पोलिसांच्या मदतीने १३ ऑक्टोबर रोजी हरदुवा मोहल्ला परिसरातून आरोपी कृष्णकुमार याला बेड्या ठोकण्यात आल्या.

कोट्यवधींचे दागिने आणि मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. यामध्ये मंगळसूत्र, सोन्याच्या मण्यांची माळ, राणीहार, सोडे, सोन्याच्या साखळ्या, सोन्याचे नाणे, लक्ष्मीहार, मोत्यांची नथ, ब्रेसलेट यांसारख्या मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे. तसेच आयफोन आणि पोको कंपनीचे दोन मोबाइल फोन असा एकूण ४८ लाख ३० हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या आरोपीविरुद्ध यापूर्वी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे, रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाणे आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.













