महायुतीत असताना असे वक्तव्य करणे अयोग्य; जरांगेच्या आंदोलनाला कुणी खतपाणी घातले हे समोर येईल: प्रविण दरेकर
Pravin Darekar on Ramdas Kadam: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली ऑडिओ क्लिप ही ‘एआय’ (AI) नसून ती भाजपचीच क्लिप आहे, असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी केला होता. या विधानामुळे महायुतीत मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, आता भाजपचे विधानपरिषद सदस्य आणि ज्येष्ठ नेते प्रविण दरेकर यांनी यावर अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. रामदास कदम यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने अशा प्रकारे भाजपवर खापर फोडणे अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत दरेकरांनी त्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रविण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, रामदास कदम हे महायुतीमधील एक ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा गृहराज्यमंत्री आहेत आणि दुसरे महत्त्वाच्या पदावर आहेत. असे असताना सत्तेत एकत्र असूनही महायुतीमधील मित्रपक्षावर आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर अशा प्रकारे बेजबाबदार वक्तव्य करणं अजिबात योग्य नाही. ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची एसआयटी (SIT) मार्फत सखोल चौकशी करा, याबद्दल आमची काहीही हरकत नाही, परंतु विनाकारण प्रत्येक गोष्टीत भाजपला दोष देणं चुकीचे असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. तसेच, आम्हाला आमच्या नेत्यांचा पूर्ण आदर आहे, असेही ते म्हणाले.
पडद्यामागे जरांगे यांना ताकद देणारे नेमके कोण?
या मुद्द्यावर बोलताना प्रविण दरेकरांनी अनेक अंतर्गत प्रश्नांना तोंड फोडले आहे. "पडद्यामागे राहून मनोज जरांगे यांना ताकद देणारे नेमके कोण होते? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करायला लावून त्यांना अंगावर सोडणारे कोण होते? आम्ही बोलायचे का? देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी पडद्यामागे कोण ताकद पुरवत होते?" असा संतप्त सवाल दरेकरांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनीच नेहमी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचे प्रामाणिक काम केले आहे, तर महाविकास आघाडी सरकारमधील उद्धव ठाकरेंना ते आरक्षण टिकवता आले नाही, असा दावाही त्यांनी केला.

जरांगे आणि रामदास कदमांच्या भूमिकेवर भाष्य
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, "आतापर्यंत जरांगे चांगले वाटत होते, आणि आता ते नाटक करत आहेत, असे म्हटले जात आहे. जरांगेंच्या प्रकृतीवर किंवा त्यांच्या औषधोपचारावरही आता वेगवेगळे दावे केले जात आहेत. जर कोणी प्रामाणिकपणे समाजासाठी आंदोलन करत असेल, तर आमचा त्यांना नेहमीच पाठिंबा आहे. आम्ही समाजासोबतच आहोत, जेव्हा लाखोंचे मोर्चे निघाले होते, तेव्हाही आमची भूमिका स्पष्ट होती. मी कधीही पडद्यामागे जाऊन कोणालाही भेटलो नाही," असे स्पष्टीकरण दरेकरांनी दिले. तसेच, जरांगे यांच्या आंदोलनाला नेमके कोणी-कोणी खतपाणी घातले, हे लवकरच समोर येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
रामदास कदमांनी काय केला होता आरोप?
यापूर्वी, रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल करतानाच भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनाही लक्ष्य केले होते. "मनोज जरांगे यांना न्याय देण्यासाठी मराठा समाजाने डोक्यावर घेतले होते, पण हा माणूस सर्वांना फसवतोय. आमचे मित्र प्रसाद लाड यांच्यासोबत जेवतात, त्यांचे स्वागत करतात, काय जिवाभावाची मैत्री झाली आहे!" असे म्हणत कदमांनी जरांगे आणि भाजप नेत्यांच्या जवळीकीवर प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, ही ऑडिओ क्लिप ‘एआय’ची नसून ती भाजपचीच क्लिप असल्याचा खळबळजनक दावा केला होता, ज्यावर आता प्रविण दरेकरांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.













