ऑडिओ क्लिप वादावरून महायुतीत कलगीतुरा; प्रसाद लाड यांच्या इशाऱ्याने राजकीय वातावरण अधिकच तापले
Prasad Lad on Ramdas Kadam: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. ही क्लिप ‘एआय’ (AI) नसून भाजपचीच असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला होता. तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावरही काही प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत रामदास कदमांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "रामदास कदम यांनी हे फालतू धंदे बंद करावेत, तुमच्याही अनेक क्लिप्स आमच्याकडे आहेत, वेळ आल्यास त्या बाहेर काढू," असा थेट आणि कडक इशारा लाड यांनी दिला आहे.
रामदास कदमांवर गंभीर आरोप आणि इशारा
प्रसाद लाड म्हणाले की, "आम्ही सर्व नेत्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सायबर विभागाला तपासाचे निर्देशही दिले आहेत. मात्र, रामदास कदम यांनी विनाकारण भाजप आणि माझ्यावर अत्यंत चुकीचे आरोप केले आहेत. महायुतीत सर्व पक्ष एकत्र असताना अशा प्रकारे मित्रपक्षावर चिखलफेक करणे योग्य नाही."
संजय राऊत यांच्यामुळे जशी शिवसेना अडचणीत आली, तसेच रामदास कदम यांच्या कृतीमुळेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना डुबवण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर दावाही लाड यांनी केला. "रामदास भाई, तुम्ही आवाज वाढवून बोललात म्हणजे आम्ही घाबरलो असे समजू नका. तुम्ही सिनियर सिटीजन आहात, त्यामुळे कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी माहिती घ्यायला हवी होती. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललात का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

"एकनाथ शिंदेंविरोधात काय बोलतात, हे बाहेर काढू"
जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, "जेव्हा मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते, तेव्हा रामदास कदम कुठे लपले होते? त्यावेळी आम्ही भाजपच्या नेत्यांनी छातीवून पुढे येत जरांगेंना उत्तर दिले होते. आज एकनाथ शिंदे आमचेही नेते आहेत, त्यांच्यासाठी रामदास कदमांनी वकिली करण्याची अजिबात गरज नाही. ते केवळ स्वतःच्या मुलासाठी आणि स्वार्थासाठी अशी विधाने करत आहेत. मागच्या काळात हेच रामदास कदम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाबद्दल काय-काय बोलले होते, हे जर आम्ही बाहेर काढले तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही," असा इशाराही लाड यांनी दिला.
तसेच, पत्रकार परिषदेत रामदास कदमांनी दाखवलेल्या बाटलीचा संदर्भ देत लाड म्हणाले, "त्याच बाटल्या घेऊन ते स्वतः झोपले होते. त्यांच्याकडे काय सुरू आहे, हे आम्हाला सर्व माहीत आहे. वेळ आल्यास त्यांच्याही सर्व













