शिवसेना-भाजपमध्ये भांडण लावण्याचे संजय राऊतांचे षडयंत्र; पोलिसांनी राऊतांना उचलून चौकशी करावी: प्रसाद लाड
Prasad Lad on Sanjay Raut: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. भाजपच्या अंतर्गत वर्तुळातील ही ऑडिओ क्लिप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीच तयार करवून घेतली असल्याचा अत्यंत गंभीर आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. दैनिक ‘सामना’च्या कार्यालयातील स्टुडिओमध्ये ही बनावट ऑडिओ क्लिप तयार करण्यात आली असून, पोलिसांनी संजय राऊत यांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली पाहिजे, अशी आक्रमक मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.
‘सामना’च्या स्टुडिओत रचला गेला कट
प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, शिवसेना आणि भाजपमध्ये जाणीवपूर्वक भांडण लावण्याचे काम संजय राऊत करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांच्या एसआयटी (SIT) मार्फत सखोल चौकशी व्हावी आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना उचलले पाहिजे. ऑडिओ क्लिपमधील ५०० कोटींच्या दाव्याबाबत बोलताना ते म्हणाले की, या क्लिपची फॉरेन्सिक टेस्ट होईलच आणि सत्य समोर येईल, परंतु या संपूर्ण खेळाचा कर्ता-करविता संजय राऊत हाच आहे. ही क्लिप तयार करण्यासाठी आवश्यक असलेली सगळी स्क्रिप्ट आणि मांडणी संजय राऊत यांनीच केली असून, त्यानंतर ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचा व्हॉईस ओव्हर करण्यात आला आहे, असा दावा लाड यांनी केला.
तसेच, "संजय राऊतांना चांगलीच माहिती आहे की, चौकशी होते तेव्हा काय होते आणि १०० दिवस तुरुंगात कसे जावे लागते," असा टोलाही त्यांनी लगावला. महायुतीमध्ये कुठेही अंतर पडणार नाही आणि आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी व त्यांच्या सन्मानासाठी ठाम आहोत, असेही लाड यांनी स्पष्ट केले.

संजय राऊतांचे प्रत्युत्तर आणि आरोप
दुसरीकडे, या वादावर बोलताना संजय राऊत यांनी दावा केला होता की, ही ऑडिओ टेप भाजपच्याच एका विधान परिषदेच्या आमदाराने फोडली आहे. हाच आमदार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावळी चर्चेसाठी त्यांच्यासोबत उपस्थित असायचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा आमदार कोण आहे, हे चांगलेच ठाऊक आहे. क्लिपमधील संभाषण ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची कोअर टीम करत असल्याचा दावाही राऊतांनी केला होता. मात्र, प्रसाद लाड यांनी राऊतांचे हे सर्व आरोप फेटाळून लावत हा सर्व बनाव ‘सामना’च्या कार्यालयात रचल्याचा पुनर्रोच्चार केला आहे.













