Shrikant Shinde on Manoj Jarange Audio Clip: “५०० कोटी रुपये एकत्र ठेवण्यासाठी किती गाड्या लागतील? मीही पैसे शोधायला निघालोय” ; खासदार श्रीकांत शिंदेंची उपरोधिक टिप्पणी

Shrikant Shinde on Manoj Jarange Audio Clip: "५०० कोटी रुपये एकत्र ठेवण्यासाठी किती गाड्या लागतील? मीही पैसे शोधायला निघालोय" ; खासदार श्रीकांत शिंदेंची उपरोधिक टिप्पणी

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप वादावर खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया..

Shrikant Shinde on Manoj Jarange Audio Clip: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणादरम्यान मनोज जरांगे यांना मॅनेज करण्यासाठी भाजपने दिलेले ५०० कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला होता. या खळबळजनक दाव्यानंतर महायुतीमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, यावर आता शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी अत्यंत मिश्किल आणि उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे.

"मलाही पडलाय प्रश्न, ५०० कोटी नक्की गेले कुठे?"
मीडियाशी संवाद साधताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, "ज्या कोणाकडे ते ५०० कोटी रुपये गेले, ते माझ्यापर्यंत तर अजिबात पोहोचलेले नाहीत. त्यामुळे जो प्रश्न मनोज जरांगे यांना पडलाय, तोच प्रश्न आता मलाही पडला आहे. आता ते पैसे नेमके कोणी घेतले, त्याला शोधायला मीच निघालोय."

पुढे बोलताना त्यांनी उपरोधिक टोला लगावला की, "आम्ही आपापसात याचीच चर्चा करत होतो की, ५०० कोटी रुपये जर एकत्र ठेवले तर ते कसे दिसतील? आणि एवढे सगळे पैसे ठेवण्यासाठी नक्की किती गाड्या लागतील? यावर कोण काय बोलतंय याला काही अर्थ नाही. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मीसुद्धा या प्रकरणाचा शोध घेत आहे, तुम्हाला जर याबद्दल काही कळले तर मला नक्की सांगा, आणि मला जर समजले तर मी तुम्हाला सांगेन."

Monas products

नेमका काय आहे वाद?
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या क्लिपमध्ये दोन महिलांमधील संभाषणाचा संदर्भ देत, मनोज जरांगे यांना हाताशी धरण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी भाजपने ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा होती. हे पैसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचल्याचा दावा यामध्ये केला गेला होता. या क्लिपमुळे राजकीय वर्तुळात एकच भूकंप आला असून, भाजप आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, सायबर व पोलीस यंत्रणेमार्फत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.