CTI Letter to Rahul Gandhi: “दिवाळीच्या काळात महारॅली स्थगित करा…”; दिल्लीतील व्यापाऱ्यांचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना पत्र

CTI Letter to Rahul Gandhi: "दिवाळीच्या काळात महारॅली स्थगित करा..."; दिल्लीतील व्यापाऱ्यांचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना पत्र

रामलीला मैदानावरील आंदोलनाने २५ हजार कोटींचा व्यापार धोक्यात येण्याची भीती; सीटीआयची काँग्रेसला नम्र विनंती

CTI Letter to Rahul Gandhi: आगामी सणासुदीच्या काळात दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या महारॅलीवरून व्यापारी वर्गात तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापारी आणि उद्योजकांची प्रमुख संस्था असलेल्या चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (CTI) लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना थेट पत्र लिहून ही महारॅली १० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्याची आग्रही मागणी केली आहे. दिवाळीच्या काळात होणाऱ्या या आंदोलनामुळे दिल्लीतील हजारो कोटी रुपयांचा व्यापार ठप्प होऊन व्यापाऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

२५ हजार कोटींचा सणासुदीचा व्यापार धोक्यात
सीटीआयचे (CTI) अध्यक्ष बृजेश गोयल यांनी राहुल गांधी यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, या वर्षी धनत्रयोदशी, दीपावली आणि भाऊबीज हे प्रमुख सण नोव्हेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत येत आहेत. धनत्रयोदशीच्या आधीपासूनच नागरिक सोने-चांदी, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, ड्रायफ्रुट्स, मिठाई आणि वाहनांची मोठी खरेदी करतात. या सणासुदीच्या काळात एकट्या दिल्लीमध्ये सुमारे २५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते, जी दिल्लीच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार मानली जाते. अशा महत्त्वाच्या काळात रामलीला मैदानावर राजकीय महारॅली झाल्यास रस्ते बंद होऊन व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गैरसोय होईल.

३ हजार कोटींचे आधीच नुकसान, १० हजार कोटींच्या फटक्याची भीती
सीटीआयच्या दाव्यानुसार, मध्य दिल्ली आणि रामलीला मैदानाच्या ५ किलोमीटर परिघात चांदणी चौक, सदर बाजार, चावडी बाजार, भागीरथ पॅलेस, खारी बावली, कश्मिरी गेट, नया बाजार, दरीबा आणि करोल बाग यांसारखे देशातील सर्वात मोठे घाऊक (होलसेल) आणि किरकोळ बाजार आहेत. येथून संपूर्ण भारतात माल पाठवला जातो. यापूर्वी झालेल्या आंदोलनांमुळे कॅनॉट प्लेस आणि मध्य दिल्लीतील व्यापाऱ्यांचे आधीच सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जर १ नोव्हेंबर रोजी पुन्हा भव्य रॅली काढण्यात आली, तर वाहतूक कोंडी आणि सुरक्षा कारणांमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान १० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा इशारा बृजेश गोयल यांनी दिला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार करून ही रॅली १० नोव्हेंबरनंतर आयोजित करावी, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Shree clinic