रत्नागिरी : वाढत्या तापमानाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रविवार कार्यकत्यांना घामाघूम करून सोडत आहे. पहाट थंडीने होत असली, तरी दुपारी चढणारे उन्ह प्रचारात अडचणीचे ठरत आहे.
ग्रामीण भागात वाडी-वस्तीवर उमेदवारासमवतेच जाणाऱ्या कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
दरम्यान, पुढील आठवडा चांगल्याच गारठ्याचा असल्याचा अंदाज हवामान विभगाने वर्तविला आहे. सोमवारपासून हवेच्या दाबात बदल होणार असून, सोमवार ते शनिवार वाढत्या दाबाने थंडीचे प्रमाण वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
कोकण किनारपट्टी भागात अद्याप अपेक्षित थंडी पडली नसली तरी पहाटे हलाकासा गारवा जाणवू लागला आहे. वातावरणात सकाळी धुक्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे तापमानही कमी आहे. रविवारी सकाळी ८ वाजता रत्नागिरीत ग्रामीण भागात २९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारी यामध्ये वाढ झाली. मात्र, उद्यापासून किनारपट्टी भागात तापमानात घट होणार असून, थंडीचे प्रमाण वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि. मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. मात्र रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ६२ ते ६९ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ५३ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत ३१ ते ४० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 11-11-2024














