रत्नागिरी : चार वेळा उमेदवारी दिली, वेगवेगळी पद दिली तरी पक्षाशी गद्दारी केली; अशांना त्यांची जागा दाखवली पाहिजे असे रोखठोक वक्तव्य बीजेपीचे जेष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बाळ माने यांना उद्देशून केले होते. आता संपूर्ण बीजेपीमध्ये याच विचारधारेचा संदेश पसरत असल्याचे दिसत आहे. रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथे प्रभाग क्रमांक ९ च्या महायुतीच्या बैठकीत याचा प्रत्यय आला. बीजेपीचे जेष्ठ नेते आणि रत्नागिरीतील जेष्ठ विधीतज्ज्ञ बाबा परुळेकर यांनी आपले सडेतोड विचार या बैठकीत मांडले. यावेळी महायुतीचे उमेदवार उदय सामंत आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
ऍड. बाबा परुळेकर बोलताना म्हणाले की भावी आमदार म्हणून उदय सामंत हे निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपल्या मतदार क्षेत्रातील कुणीही व्यक्ती मतदानाशिवाय राहणार नाही ही आपली जबाबदारी आहे. बाळ माने यांच्यासोबत उमेदवारीसाठी मी देखील प्रयत्न करीत होतो मात्र माझा नंबर खालीच राहिला. पक्षाने सर्व देऊनही पक्षाची विचारधारा प्रमाणभूत मानली पाहिजे हे जर कुणी मानत नसेल तर त्याला योग्य तो धडा शिकवला पाहिजे. पक्षशिस्त हीच महत्त्वाची आहे आणि त्याप्रमाणे काम केले पाहिजे. कुणीही काहीही सांगितले तरी या निवडणुकीला पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्य मिळवणे ही आपल्या विचारधारेशी असणाऱ्या शक्तीचे द्योतक आहे. पुढील टर्म मध्ये आपला आमदार महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर जावा ही इच्छा व्यक्त करतो असे ऍड. बाबा परुळेकर आपल्या छोटेखानी भाषणात म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 11-11-2024














