रत्नागिरी : समाजामध्ये वाद लावायचे, धर्मामध्ये वाद लावायचे आणि स्वतः मतदारांमध्ये राजकारण करायचे, असे घाणेरडे प्रकार रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात कधीही नव्हते. ते घडवण्याचं काम सुरू झालेले आहे. त्याला जबाबदार जे इकडून तिकडे गेलेले उमेदवार असून, त्यांना आता हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये पटवर्धनवाडी येथे आयोजित सभेत बोलत होते. या वेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, राजश्री शेट्ये, माजी नगरसेवक उमेश शेट्ये, भाजपचे मंदार मयेकर, माजी नगरसेवक मुसा काझी व पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, आपण सगळे सध्या सोशल मीडियावरुन मत बनवतो. त्यामुळे रत्नागिरीकरांना एक विनंती करायची आहे की २५ वर्षे राजकारणामध्ये काम करताना कुठच्याही जातीला, कुठच्याही धर्मात वाद होईल असे वक्तव्य मी केलेले नाही. परंतु या सगळ्याचं भांडवल करून मत मागण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याचे डिपॉझिट जप्त केलं पाहिजे. तुम्ही जर मनामध्ये आणलं तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जाऊ शकते, एवढी ताकद या रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघांमध्ये आहे. सकाळी आठ वाजल्यापासून या तालुक्यांमध्ये मतदारसंघामध्ये बैठका घेतल्या. त्याला प्रचंड मोठी गर्दी होती. येणारा प्रत्येकजण संकल्प करीत आहे, की ज्यांनी या गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये जातीयवाद पेरण्याचा प्रयत्न केला, त्यांना मतदान करणार नाही, असा निश्चय गावे करताहेत. प्रभाग तीनमधील जी विकासाची कामं झालेली आहेत, ती शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाच्यामार्फत झालेली आहेत. त्यामुळे ही निवडणूक नुसती जिंकण्यासाठी महत्त्वाची नाही तर विक्रमी मताधिक्य घेण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत, एवढीच विनंती मला करायची आहे, असे ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 11-11-2024













