चिपळूण : पावसाळा संपल्याने वाशिष्ठी नदी कोरडी पडू लागली आहे. त्यातच गोवळकोट येथील जॅकवेल गाळात रुतल्याने अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने वाशिष्ठी नदीत पाट काढून पाण्याचा प्रवाह गोवळकोट जॅकवेलकडे वळवला आहे. त्यामुळे आता हे पाट नागरिकांची तहान भागवणार आहेत.
चिपळूण पालिकेच्या गोवळकोट जॅकवेलमधून गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप, बाजारपेठ, उक्ताड या भागांना पाणीपुरवठा केला जातो; मात्र ज्या भागात जॅकवेल आहे, त्या भागात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्या बाजूला वाशिष्ठी नदीचे पाणी न जाता दुसऱ्या बाजूने निघून जाते. पावसाळ्यात नदीपात्र कायम भरून वाहात असल्याने नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर तितकासा परिणाम होत नाही; मात्र पावसाळा संपताच दरवर्षी उन्हाळ्यात नदीच कोरडी पडत असल्याने जॅकवेल परिसर पाण्याविना राहतो. त्यामुळे पाण्याची उचल करता येत नाही. ही परिस्थिती आता आली आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळी कधीही पाणी येत असून, रात्री ११ वाजताही पाणी सोडले जात असल्याने त्यांना पाण्यासाठी रात्र जागवावी लागत आहे. याची सध्या ओरड सुरू असल्याने नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने वाशिष्ठी नदीत पाट काढून पाण्याचा प्रवाह जॅकवेलकडे वळवला आहे. त्यामुळे आता नागरिकांना थोडासा दिलासा मिळणार आहे. याउलट अर्ध्या शहराची तहान भागवणारी खेड-माळेवाडी येथे जॅकवेल कायम पाण्याने भरलेली राहत असल्याने ती मात्र अर्ध्या शहरासाठी वरदान ठरली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 11/Nov/2024














