दापोली : आंजर्ले खाडीत साचलेल्या गाळामुळे नौका मार्गात अडथळा

दापोली : आंजर्ले खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. मच्छीमारांकडून शासनाकडे वर्षानुवर्षे मागणी करूनही आंजर्ले खाडीत साचलेला गाळ काढला जात नसल्याने अडखळ तसेच आंजर्ले खाडीतून मासेमारी होड्या समुद्रात लोटताना आणि समुद्रातून होड्या परत अडखळ, आंजर्ले खाडी किनाऱ्यावर आणताना मच्छीमारांना खूपच त्रास होत आहे.

दापोली वालुक्यातील हर्णे बंदरात मच्छीमारांना नौका लावण्यासाठी जेटी बांधण्यात यावी यासाठी मच्छीमारांकडून वर्षांनुवर्षे सरकारचे उंबरठे झिजवले गेले. अनेकवेळा पत्रव्यवहारही केला; मात्र जेटी काही झाली नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा सुरक्षित ठिकाण म्हणून अडखळ आणि आंजर्ले खाडीचा आधार घेतला जातो. शिवाय नौका दुरुस्तीसाठीही आंजर्ले, अडखळ खाडीकिनारा सुरक्षित आहे; मात्र, या नौका आणण्यासाठीचा मार्ग पूर्णपणे गाळाने भरला आहे. त्यामुळे या साचलेल्या गाळात नौका रुतातत. काही नौका गाळात रुतून त्यांना जलसमाधीसुद्धा मिळाली आहे. त्यामुळे येथून खाडीच्या किनाऱ्यावर नौका आणताना मच्छीमारांना तारेवरची कसरत करावी लागते.

भरतीच्या वेळेसच नौका आत खाडीत आणता येते किंवा खाडीच्या बाहेर काढता येते. त्यामुळे खूप मोठ्या नुकसानाला येथील मच्छीमारांना सामोरे जावे लागते. अनेक अशा नौका बुडतील, मच्छीमारांचे करोडो रुपयांचे नुकसान होईल तेव्हा शासनाला जाग येणार का? अशी संतप्त प्रतिक्रिया येथील मच्छीमारांकडून येत आहेत.

अनेक वर्षे आंजर्ले खाडीच्या गाळ काढण्यासंदर्भात शासनाकडे आमच्या मच्छीमार नेत्यांनी पाठपुरावा केला आहे. शासनाकडून अजूनही कोणतीच कार्यवाही होत नाही. याबाबत खेद वाटत आहे. आम्हा मच्छीमारांना वादळसदृश परिस्थितीमध्ये नौकांना आसरा घेण्यासाठी सुरक्षित म्हणून हे एकच ठिकाण आहे तेही तोंडावर असलेल्या गाळामुळे धोकादायक आहे. – अनंत चौगले, मच्छीमार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 11/Nov/2024