खेडमधील गरम पाण्याच्या कुंडाची दुरवस्था

खेड : शहराच्या मध्यवर्ती भागात संरक्षित हरितपट्टा असून, या हरितपट्टयात पुरातन व पवित्र गरम पाण्यांचे कुंड आहे. मागील काही वर्षे या परिसराकडे सर्वत्र यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्याने काही समाजकंटकांनी या क्षेत्राला आपला अड्डा बनवले आहे. या परिसराची दुरवस्था झाली असून, तातडीने हा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

खेड शहराला प्राचीन, ऐतिहासिक, पौराणिक, वारसा असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या शहरात पुरातन काळातील अनेक खुणा विविध ठिकाणी आढळून येतात. शहरातील खांबतळे, पुरातन लेणी, बंदर परिसर व तेथील शेकडो वर्ष जुन्या समाधी, गरम पाण्यांचे कुंड, भैरी मंदिर आदी ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर त्याची साक्ष पटते; परंतु ही सर्वच ठिकाणे दुर्लक्षित व अविकसित राहिली आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून शहरातील या ठिकाणांच्या विकासासाठी प्रयत्न सुरु आहेत. लाखो रुपयांचा निधी जाहीर होत आहे. गरम पाण्याच्या कुंडाकडे इतिहास काळामध्ये जेवढे लक्षपूर्वक पाहिले जात होते तसे आधुनिक काव्ळात पाहिले जात नसल्याची खंत जाणकार व्यक्त करीत आहेत.

खेड शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाकडे जाण्याकडे पालिकेमार्फत स्वागत कमान, रेलिंग सुशोभिकरणाच्या कामामध्ये लाखो रुपये खर्च झाले आहेत; परंतु सध्याची परिस्थिती पाहता ही रक्कम कोणत्या गोष्टीवर खर्च झाली असा प्रश्न पडतो.

प्रवेशद्वाराजवळ बाढलेल्या वेली, पादचारी मार्गाच्या दुतर्फा आठ ते दहा फूट उंच वाढलेली गर्द झाडी, कुंडाच्या परिसरात एक ते दोन फूट वाढलेले गवत, कचऱ्याचा खच, पवित्र कुंडाच्या पाण्यात साचलेला गाळ, परिसरात पडलेल्या रिकाम्या मद्याच्या व पाण्याच्या बाटल्या, सिगरेटची पाकिटे हे चित्र विदारक आहे. शहराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक पवित्र स्थान असलेल्या या गरम पाण्याच्या कुंडाकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देऊन त्याचे गतवैभव त्याला परत मिळवू देतील, अशी अपेक्षा खेडवासीय व्यक्त करीत आहेत.

स्वच्छता आणि देखभालअभावी या गरम पाण्याच्या कुंडाचे पावित्र्य लोप पावत आहे. हे पावित्र्य जपण्यासाठी पालिका आणि नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. – सुनील रेवाळे सामाजिक कार्यकर्ते, खेड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 11/Nov/2024