हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये मराठी महिलांना धमकाविणाऱ्या परप्रांतीयांना चिपळुणात मनसेचा इंगा

चिपळूण : रत्नागिरीहून हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसने वसई येथे निघालेल्या चार महिला आणि एका तरूणाला परप्रांतीय तरूणांनी दमदाटी व मारहाण केल्याची घटना घडली. गाडीमध्ये जागा असताना ते सीटवर झोपले होते. यावेळी रत्नागिरीत चढलेल्या प्रवाशांनी त्यांना जागा देण्याची विनंती केली असता या परप्रांतीय तरूणांनी महिला व तरूणाशी हुज्जत घातली व तरूणाला जोरदार मारहाण केली. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना ही माहिती कळल्यानंतर त्यांनी चिपळूणमध्ये या परप्रांतीय तरूणांना उतरवून मनसे स्टाईलने इंगा दाखवित पोलिसांच्या हवाली केले आणि महिलांना सुरक्षा दिली.

शनिवारी (दि.९) रात्री ही घटना रत्नागिरी येथे घडली. रत्नागिरीहून वसईकडे निघालेल्या चार महिला व एक तरूण हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये बसले. गाडी रत्नागिरी येथून थेट पनवेल येथे थांबणार होती. गाडीत शिरल्यावर जागा असतानाही परप्रांतीय तरूणांनी या महिलांना जागा दिली नाही व अरेरावीची भाषा केली, तर त्यांच्यासोबत असलेल्या तरूणांना मारहाण केली. ‘हिंदी में बोलो मराठी मे मत बोलना’ अशाप्रकारे दमदाटी केली. भोके दरम्यान हा प्रकार सुरू असताना त्या महिलांच्या संरक्षणासाठी कोणीही धावून आले नाही. गाडीमध्ये टीसी होता. त्यांनीदेखील मदत केली नाही.

रेल्वे पोलिस या गाडीला नव्हतेच. यामुळे या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर त्यांनी याबाबत मनसेचे नेते अविनाश जाधव, कोकणचे नेते वैभव खेडेकर यांना तत्काळ फोनवरून माहिती दिली व त्यांनी चिपळूण येथील मनसेचे शहरप्रमुख अभिनव भुरण यांना कळविले, तोपर्यंत गाडी आरवलीपर्यंत आली होती. चिपळूणमध्ये या एक्स्प्रेसला थांबादेखील नव्हता. अखेर गाडीतील त्या मराठी तरूणांनी चिपळूण स्टेशनजवळ गाडी येताच चेन खेचली व गाडी थांबवली. तोपर्यंत मनसेचे कार्यकर्ते चिपळूण रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. त्यांनीही स्टेशन मास्तर आणि रेल्वे पोलिसांना भेटून याबाबत कल्पना दिली होती व स्टेशन मास्तर यांना गाडी थांबवण्याची विनंती केली होती.

याचदरम्यान चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे गाडी चिपळूण स्थानकात थांबताच त्या डब्यातून परप्रांतीय टोळक्याला बाहेर काढण्यात आले. यानंतर मनसैनिकांनी त्यांना इंगादेखील दाखविला आणि पोलिसांच्या हवाली केले.

याबाबत पोलिस अधिक तपास करीत असून रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून चिपळूण पोलिस कार्यवाही करीत आहेत.

मराठी माणसाच्या हक्कासाठी मनसेच…
हजरत निजामुद्दीन या एक्स्प्रेस गाडीमध्ये संरक्षणासाठी रेल्वे पोलिसच नव्हते. हा महत्त्वाचा विषय आहे. या शिवाय मराठी माणसाच्या हक्कासाठी मनसेच लढू शकते. संकटाच्यावेळी मनसे कार्यकर्ते नेहमीच धावून जातात. आज वसईत जाणाऱ्या महिला व तरुणाला वाचविण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी धाव घेतली. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्काची म्हणून मनसेच आहे, असे मनसेचे शहरप्रमुख अभिनव भुरण यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 11/Nov/2024