रत्नागिरी : मासळीचे दर खवय्यांच्या आवाक्यात !

रत्नागिरी : महिनाभरानंतर मासळीचे दर खवय्यांच्या आवाक्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणच्या मासळी मार्केटमध्ये रविवारी ग्राहकांची गर्दी होती. मिरकरवाडा बंदरावर बांगडा १०० रुपये किलो तर सुरमई ४०० ते ६०० रुपये किलो दराने विकली जात आहे.

मच्छीमार नौकांना मासळी मिळण्याचे प्रमाण चांगले असल्यानंतर मासळीचे दर उतरतात. महिनाभरापूर्वी मासळी मिळण्याचा रिपोर्ट कमी असल्याने दर वधारलेले होते. ९०० रुपये किलो दराने मिळणारी लहान आकाराची सुरमई रविवारी ४०० रुपये तर मोठ्या आकाराची ६०० रुपये किलो दराने मिरकरवाडा जेटीवर उपलब्ध होती.

महिनाभरापूर्वी बांगड्याचा किलोचा दर २०० रुपये होता तो रविवारी १०० रुपये इतका होता. सरंगा ६०० रुपये किलो दराने मिळत होता. महिनाभरापूर्वी हाच दर ६०० पेक्षा अधिक होता. सौंदाळ्याचा दर मात्र महिनाभरापूर्वीप्रमाणेच ३०० रुपये किलो इतकाच होता. कोळंबीचा दरही प्रतवारीप्रमाणे ८० ते ३०० रुपये किलो आहे

रत्नागिरीतील विविध मासळी मार्केटमध्ये मिळणारी मासळी मिरकरवाडा बंदरावरूनच आणून विकली जाते. त्यामुळे बंदरावर असणाऱ्या मासळीच्या दरानुसार विविध मासळी मार्केटमधील दर अवलंबून असतात. रविवारी हे दर खवय्यांना परवडणारे होते. त्यामुळे बाजारपेठेतील मच्छीमार्केटसह राजीवडा, मिरकरवाडा येथील मासळी मार्केटमध्ये खवय्यांची गर्दी होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 11/Nov/2024