गुहागर : गुहागर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने काहीसे नाराज असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी झटकून पुन्हा एकदा महायुतीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते व मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या चिपळुणातील सभेत महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमुखी एकजूट होऊन आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत.
गुहागरमधून भाजपला उमेदवारी न मिळाल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. भाजपने गुहागर मतदारसंघात यापूर्वीच प्रचार केला होता. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांच्या घरापर्यंत आपली निशाणी पोहोचविली होती. मात्र, अचानक महायुतीतील शिंदे गटाला उमेदवारी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यातच भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष जैतापकर यांनी पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांचीही मनधरणी करण्यात भाजपा नेत्यांना यश आल्याने त्यांनी अर्ज मागे घेऊन महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
भाजपा कार्यकर्त्यांनी नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपळूण येथे येऊन महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची सभा घेत नाराजीचा पडदा बंद केला. सर्वांना एकाच व्यासपीठावर आणून चव्हाण यांनी महायुतीत कोणतीही फूट, नाराजी नसल्याचे सर्वपक्षीयांना दाखवून दिले. भाजपच्या कार्यकत्यांची समजूत काढून त्यांना सक्रिय होण्याचा सल्ला या सर्व राजकीय घडामोडीत देण्यात आला.
महायुतीच्या विजयासाठी एकजूट…
गुहागरमध्ये भाजपची प्रचार यंत्रणा यापूर्वीच बांधली गेली आहे. बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांच्याशी संवाद होऊन त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. प्रत्येकजण गाव पातळीवर महायुती उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करत आहेत. स्वतः माजी आ. डॉ. विनय नातू लक्ष ठेवून आहेत. कार्यकर्त्यांकडून नियमित प्रचाराचा आढावा घेण्यात येत असून पदाधिकाऱ्यांकडे प्रत्येक गटाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकूणच महायुतीत एकजूट झाली असून उमेदवाराच्या प्रचारासाठी सर्वांनीच कंबर कसलेली दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 11/Nov/2024














