रत्नागिरी : राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी योजना शिक्षण संचालनालयाने शालेय विद्यार्थी व नव साक्षर यांच्यासाठी व्हिडीओ निर्मिती आणि कौटुंबिक पत्रलेखन उपक्रम आयोजित केले आहेत. योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्रात कमी मतदान झाल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर योजना शिक्षण संचालनालयाने आयोजित केलेले दोन्ही उपक्रम अनोखे असेच आहेत.
राज्यात मार्च २०२४ रोजी झालेल्या परीक्षेत ४ लक्ष २५ हजार ९०६ इतके असाक्षर आता नवसाक्षर झाले आहेत. साक्षरता कार्यक्रमात असाक्षरांना मतदान प्रक्रियेविषयी सचित्र माहिती देऊन साक्षर करण्यात आले आहे. या नवसाक्षरांनी मतदान प्रक्रियेत शंभर टक्के मतदानाचा अधिकार बजावून कुटुंबातील इतर सदस्यांना व आप्त नातेवाईकांनाही मतदानासाठी प्रेरित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवसाक्षरांसह राज्यातील इयत्ता पाचवी ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांनी कौटुंबिक पत्रलेखन व व्हिडीओ तयार करून सर्व पात्र मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्याविषयी सूचित केले आहे. शाळा, तालुका, जिल्हा स्तरावर या दोन्ही उपक्रमांत सर्वोत्कृष्ट प्रत्येकी पाच पत्रे आणि व्हिडीओ निर्मितीसाठी प्रशस्तीपत्रे निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर वितरित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम असाक्षरांमध्ये केवळ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करणे एवढ्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित नसून महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये, मूलभूत शिक्षण, व्यावसायिक कौशल्ये विकसित करणे व त्यांना निरंतर शिक्षण देणे या प्रमुख उद्दिष्टांचाही नवभारत साक्षरता कार्यक्रमात समावेश आहे. उल्लास मार्गदर्शक पुस्तिका क्रमांक २ मध्ये मतदान प्रक्रियेची सविस्तर व सचित्र माहिती देण्यात आली आहे. लोकशाहीच्या सुदृढीकरण व बळकटीकरणासाठी सर्व प्रौढ़ नागरिकांनी मतदान करणे गरजेचे आहे. आपले मत लोकशाहीचा प्राण आहे, ही बाब सर्व प्रौढ नागरिकांमध्ये बिबवणे आवश्यक आहे.
मतदान जनजागृतीसाठी व्हिडीओ निर्मिती पत्रलेखनाचे गटामध्ये शालेय विद्यार्थी गट अ) इयत्ता ५ वी ते ८ वी, ब) इयत्ता ९ वी ते १२ वी., नवसाक्षर (दि. १७ मार्च, २०२४ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले नव साक्षर) असे आहेत. तर दोन्ही उपक्रमांसाठी आई-बाबा, आजी-आजोबा, काका-मावशी, मामा- मामी मतदान करायचं हं! असा विषय देण्यात आला आहे.
नातेवाईकांना पत्र लिहिण्याचा उपक्रम
कौटुंबिक पत्रलेखनाद्वारे विद्यार्थी आई-वडिलांना घरातच समक्ष पत्र देऊन, तर इतर नातेवाईकांना टपालाद्वारे पत्र पाठवून मतदान करण्याबाबत हट्ट धरतील, नव साक्षरांनीही स्वयंसेवकांच्या मदतीने पत्र लिहिगे अपेक्षित आहे. शालेय विद्यार्थी व नव साक्षर यांनी मतदानाचे महत्त्व व्हिडीओच्या माध्यमातून पटवून देणे अपेक्षित आहे. याबाबत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याचीही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 11/Nov/2024














