खेड : मुंबई – गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळण अपघातांच्या दृष्टीने शापित बनलेले असतानाच दिशादर्शक फलकांअभावीही वाहनचालकांची फसगत होत आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून भोस्ते घाटात कुठेही दिशादर्शक फलक लावण्याची तसदी घेतलेली नाही. यामुळे भोस्ते घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे.
महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याने वाहनचालकांचा प्रवास सुस्साट झाला आहे. वाहनचालकांच्या वेळेची बचत होत असली तरी चौपदरीकरणातील भोस्ते घाट वाहनचालकांसाठी डोकेदुखीच ठरत आहे.
घाटातील वळणावर अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच असल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. भोस्ते घाटातून मार्गस्थ होताना वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत.
भोस्ते घाटात कुठेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही. अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या भोस्ते घाटात अपघात प्रवण फलक लावण्याची तसदी अद्यापही राष्ट्रीय महामार्ग खात्याने घेतलेली नाही. दिशादर्शक फलकांअभावी वऱ्याचवेळा वाहनचालक बुचकळ्यात पडत आहेत.
विशेषतः अपघातांचे ‘स्पॉट’ असलेल्या ठिकाणी फलक लावणे गरजेचे असतानाही त्याकडे कानाडोळा करण्यात आला. यामुळे घाटातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची डोकेदुखी कायम राहिली आहे.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
भोस्ते घाटातील अवघड वळणे आणि निसरडा रस्ता व गतिरोधक या ठिकाणी मार्गदर्शक फलक लावणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीय बांधकाम विभागाने या संदर्भात लक्ष देवून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील रहावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 11/Nov/2024














