रत्नागिरी : राजेश बेंडल, अविनाश लाड यांना ओबीसी जनमोर्चाचा पाठिंबा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेकडून उभे असलेले उमेदवार राजेश रामभाऊ बेंडल आणि राजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले अपक्ष उमेदवार अविनाश शांताराम लाड यांना ओबीसी जनमोर्चाने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.

ओबीसी जनमोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी हे पत्रकार परिषदेत सांगितले. ही निवडणूक ओबीसींच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची आहे. ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना ओबीसी मतदारांची ताकद काय आहे हे दाखवून देणार असल्याचे यावेळी श्री. बावकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, अनेक वर्षे देशभरात जातनिहाय जनगणनेची मागणी होत असताना केंद्र सरकार ती करायला तयार नाही. त्यामुळे ओबीसींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ४०० पारच्या वल्गना करणाऱ्या सरकारला ओबीसी बांधवांनी मतदानाच्या रूपाने त्यांची जागा दाखवली. महाराष्ट्र सरकार नेहमीच ओबीसीविरोधी निर्णय घेऊन ओबीसींवर अन्याय करत आहे. मराठ्यांना कुणबी जातीचे बोगस दाखले देऊन मागील दाराने ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. “सगेसोयरे”सारखे अध्यादेश काढून घटनेची पायमल्ली केली. ओबीसी महामंडळाला निधी, वसतिगृहे, शिष्यवृत्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण, जातनिहाय जनगणना यांसारख्या अनेक मागण्यांबाबत निवेदने, आंदोलन मोर्चा काढूनसुद्धा सरकार निष्क्रिय राहिले किंबहुना ओबीसींना दुर्लक्षित केले. आताच्या विधानसभा निवडणुकीतही अनेक पक्षांमध्ये निष्ठेने काम करणाऱ्या ओबीसी इच्छुक उमेदवारांना डावलले गेले आहे. ते म्हणाले, राजापूर मतदारसंघात मागील निवडणुकीमध्ये ५४ हजार मते घेणाऱ्या पक्षाच्या उमेदवारालाही डावलले गेले. त्यामुळे बहुजनांचे उमेदवार म्हणून अविनाश लाड यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील सर्व ओबीसी समाज अविनाश लाड यांच्या मागे उभा राहिला आहे. त्याचप्रमाणे गुहागर मतदारसंघातील ओबीसी उमेदवार राजेश बेंडल यांना सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या मतांच्या फरकाने निवडून द्यावे, असे आवाहन ओबीसी जनमोरच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले. यावेळी श्री. बावकर यांच्या समवेत ओबीसी जनमोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गीते, दीपक राऊत, काका तोडणकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 11-11-2024