गणपतीपुळे : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक पर्यटनासाठी कोकणात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिकांसह वॉटरस्पोर्टस् चालकांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. गणपतीपुळेत वॉटरस्पोर्टस् सुरू झाल्यामुळे पर्यटकांना आता गोव्यातील मौजमजा गणपतीपुळे परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर अनुभवता येत आहे.
रत्नागिरीत पर्यटनदृष्ट्या अनेक उपक्रम राबवले जात आहेत. गत मे महिन्यात पर्यटकांनी मोठ्या संख्येने रत्नागिरी जिल्ह्यात भेट दिली होती. मुंबई, पुण्यातील पर्यटक रायगडप्रमाणेच दापोलीतील समुद्रकिनाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचे दिसून आले. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, सीमा भागातील पर्यटक गुहागर, गणपतीपुळे, रत्नागिरी तालुक्यासह सिंधुदुर्गकडे वळल्याचे चित्र होते.
गणेश उत्सवामध्येही बऱ्यापैकी पर्यटकांची पावले जिल्ह्याच्या किनारी भागात व सह्याद्री पट्टयाकडे वळली होती. समुद्रकिनारी असणाऱ्या या पर्यटनस्थळामुळे पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने याठिकाणी वळू लागली आहे. लाखो पर्यटक वर्षाला या ठिकाणी भेट देत आहेत.
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गणपतीपुळेत दाखल झालेले पर्यटक गणेश दर्शनानंतर समुद्रकिनारी पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे वॉटरस्पोर्टस्ही या ठिकाणी सुरु झाले आहेत. पर्यटकांना पोहताना धोका पोहोचू नये यासाठी याठिकाणी लाईफगार्डही आहेत. एखादी दुर्घटना घडलीच तर वॉटरस्पोर्टचे सदस्य आणि स्थानिक व्यावसायिकही या ठिकाणी धाव घेत बचाव कार्य करण्यातही पुढे आहेत. रत्नागिरी शहरानजीक भाट्ये खाडीमध्ये बॅकवॉटर सफारीचीही सुविधा उपलब्ध होत असल्याने व त्याच ठिकाणी होडीमध्ये जेवणही दिले जात असल्याने, या भटकंतीलाही पसंती मिळत आहे. गुहागर समुद्रकिनारीही वॉटरस्पोर्टस्ला पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे. त्याचप्रमाणे दापोली समुद्रकिनारीही दोन ते तीन ठिकाणी वॉटरस्पोर्टस् सुरू आहेत.
आरेवारेतील रिव्हरक्रॉसिंगचा धाडसी अनुभव
गणपतीपुळे, नेवरे ते रत्नागिरी मार्गावरील प्रसिध्द आरेवारे बीचवरही वॉटरस्पोर्टसची सुविधा असून, रिव्हरक्रॉसिंगचा अनुभवही घेता येत आहे. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीही उत्स्फूर्तपणे रिव्हरक्रॉसिंगचा धाडसी अनुभव घेत आहेत.













