चिपळूण : कितीही वंदा…कितीही निंदा…आमचा विकासाचा वादा…एकच अजितदादा…शेखर निकम यांना पुन्हा एकदा निवडणू आणा अन चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ विकासकामाने नावारूपास येईल…असा विश्वास हास्य जत्राफेम विनोदी अभिनेते आणि राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी कळंबस्ते येथे व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार शेखर निकम याच्या प्रचारसभेचे आयोजन कळंबस्ते येथे करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते बाप्पा सावंत, शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती शौकतभाई मुकादम, भाजपचे नेते रामदास राणे, भाजपच्या नेत्या सौ. चित्रा चव्हाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापू आयरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शिवसेनेचे दिलीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विनोदी अभिनेते भाऊ कदम बोलत होते.
भाऊ कदम यांनी सुरूवात करताच जोरदार टाळ्यांचा गजर करण्यात आला…हसताय ना! हसायलाच पाहिजे, असे म्हणताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला…मला भाषण करता येत नाही…मला अजितदादानी डेरिंग करायला लावली आहे…राजकारण आपल्याला माहीत नाही. अजितदादा कसे आहेत, मला माहित नव्हते. मात्र, त्यांच्याबद्दल ऐकले आणि पाहिले तेव्हा कळले की हा माणूस किती काम करतो आहे, असे भाऊ कदम म्हणाले.
मला विरोधकांवर काही बोलायचे नाही पण मला इथे महिती मिळाली आहे की शेखरसरांनी मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. मात्र काही ठिकाणी टीका होते आहे. मात्र, कितीही वंदा कितीही निंदा, आमचा विकासाचा वादा आहे ! असे भाऊ कदम यांनी म्हणताच पुन्हा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. शेखर सरांना तुम्ही खंबीर साथ देत आहात, हे बघून मला आनंद झाला. यापुढेही चांगलेच घडणार आहे. कारण शेखर सर हा माणूस प्रामाणिक आणि साधा आहे, त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि अजितदादांना मुख्यमंत्री केले जाईल. यासाठी शेखर सरांना निवडून देण्याचे आवाहन भाऊ कदम यांनी केले.
पाच वर्षात शेखर निकम यांनी निधी आणून गाववाडीवर विकासाची कामे केली आहेत. अजून त्यांना संधी द्या आणि तुमच्या चिपळूण -संगमेश्वर मतदारसंघाचे नाव विकासात ते नावारूपास आणतील, असा विश्वास भाऊ कदम यांनी व्यक्त केला.
शेखरसरांनी माझ्याकडे नावाचा कागद दिला त्यांचे अक्षर खूप सुंदर आहे…माझं ही अक्षर खूप सुंदर आहे…शाळेत मला माझे शिक्षक दहा दहा वेळा तेच ते लिहून आणायला सांगायचे एवढे अक्षर सुंदर आहे. (जोरदार हशा) मी हुशार विद्यार्थी असल्याने माझ्या आरोग्याची काळजी माझे शिक्षक घेत असत…पहाटेच मला शाळेच्या बाहेर उभे करायचे…व्हीट्यामिन डी घेण्यासाठी…अनेक वेळा वर्गात उभे करायचे…मला काही बोलायचे नाही कारण मी हुशार ना! माझ्या वडिलांजवळच शिक्षक बोलत असत तसा मी हुशार होतो म्हणून…असे सांगताच उपस्थित हजारोच्या गर्दीने जोरदार टाळ्यांचा कडकडाट करीत हास्याचा खळखळाट केला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती शौकत मुकादम आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 11-11-2024














