देवरूख : जाखडी कला ही कोकणचे सांस्कृतिक वैभव आहे. कोकणच्या जाखडीसारख्या लोककलेचे जतन व संवर्धन तसेच मनोरंजन आणि समाजप्रबोधन या उद्देशाने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी कला सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. देवरुखची ग्रामदेवता सोळजाई मंदिराच्या रंगमंचावर सादर केलेल्या जाखडीसाठी चिपळूण-संगमेश्वरचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक करून गौरवोद्गार काढले.
सोळजाई मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने सदानंद चव्हाण यांनी सन्मानित केले. विद्यार्थ्यांनी या जाखडी कलेद्वारे स्त्रीभ्रूण हत्या, व्यसनाधीनता, स्त्रियांवरील अत्याचार व स्त्री सबलीकरण, पर्यावरण जागृती व संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन या समस्यांवर प्रबोधन केले.
केशवसृष्टी प्रतिष्ठानच्या वतीने कॉटन आर्टच्या पूजा व प्रथमेश भालेकर या दाम्पत्याने भेटवस्तू देऊन सर्व विद्यार्थी कलाकारांना सन्मानित केले.
सन्मानित करण्यात आलेले विद्यार्थी कलाकारांमध्ये मनीष शिगवण (शाहीर), प्रणव गुरव व दुर्वेश गीते (कोरस), रोहन गोताड, प्रणव लिंगायत व हार्दिक घवाळी (संगीत साथ), मंथन भेरे, प्रणव बोले, सुशील पर्शराम, निखिल पर्शराम, शितल वाजे, सिद्धी गुरव, पूनम फापे व प्रणाली जाधव (नृत्य कलाकार) याचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. सीमा कोरे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. सुनील वैद्य, प्रा. वसंत तावडे आणि प्रा. धनंजय दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी मनोरंजन व समाजप्रबोधनासाठी केलेल्या जाखडी सादरीकरणाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 11/Nov/2024














