खेड : शहरातील स्वरूपनगर येथे एकाच रात्रीत तीन फ्लॅट फोडून चोरट्यांनी येथील पोलिसांची झोपच उडवली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वरूपनगर येथील आयडल व्ह्यू अपार्टमेंटमधील एक फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या फ्लॅटधारकाच्या कार्यालयातून चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे समजते. आयडल व्ह्यू अपार्टमेंटमधील चोरीच्या प्रयत्नानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा समोरील बेग अपार्टमेंटमध्ये वळवला. या इमारतीतील फ्लॅट बंद असल्याची संधी साधत डल्ला मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या ठिकाणीही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे समजते. एका फ्लॅटमधून १० ते १३ हजाराची रोकड लंपास झाल्याचे समजते. शहरातील महाडनाका येथील साई अपार्टमेंट मधील खोली नं. डी-०२ चा बंद फ्लॅटचा बाहेरील दरवाजा, कडी, कोयंडा व लॉक कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी हत्याराने तोडून त्याद्वारे फ्लॅटचे आतमध्ये प्रवेश करून बेडरूममधील लाकडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले १४ हजार किंमतीचे दोन ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, ५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे चांदीचे ३ कॉईन आणि १० हजार रुपये रोख असा २४ हजाराचा माल चोरून नेला आहे.
ही घटना दि.५ नोव्हेंबर दुपारी ३:३० ते दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वा. मुदतीत घडली असून फ्लॅटधारक जगदीश महादेव जाधव (५६), यांनी तक्रार दिल्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाच रात्रीच झालेल्या घरफोड्यांनी येथील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हानच येथील पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 11/Nov/2024